वोकहार्ट हॉस्पिटल आणि काशीमीरा ट्रॅफिक पोलिसांचा रस्ते सुरक्षा अभियान
रस्ते सुरक्षा महिन्यानिमित्त सीएसआर उपक्रमांतर्गत दुचाकी चालकांना २५० हेल्मेटचे वाटप
मिरा -भाईंदर : वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड आणि काशीमीरा ट्रॅफिक पोलिसांच्या यांनी रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान आयोजित केला. हा उपक्रम रुग्णालयाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत राबविण्यात आला असून, वाहतूक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करणे व नागरिकांमध्ये सुरक्षित रस्ते वर्तनाबाबत जनजागृती करणे हा यामागील उद्देश होता.
या अभियानांतर्गत मीरा रोड व काशीमीरा परिसरातील प्रमुख वाहतूक चौकांवर दुचाकी वाहन चालकांना एकूण २५० हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. यासोबतच वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षात्मक साधनांचा वापर तसेच रस्ते अपघातांचे दीर्घकालीन आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वॉकहार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दुचाकी चालक व पादचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत आपत्कालीन व ट्रॉमा केअर मधील अनुभव सांगितले. मूलभूत सुरक्षितता उपायांकडे दुर्लक्ष केल्यास कशा प्रकारे गंभीर डोक्याच्या दुखापती होतात व अनेक वेळा टाळता येण्यासारख्या मृत्यूंची शक्यता निर्माण होते, यावर त्यांनी विशेष भर दिला.
या उपक्रमाला काशीमीरा ट्रॅफिक पोलिसांचे भरीव सहकार्य लाभले. सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) सतीश शिवरकर व पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी अभियानाला योग्य मार्गदर्शन करून ते यशस्वीपणे राबविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या सहभागामुळे आरोग्य संस्था व कायदा अंमलबजावणी यंत्रणांची रस्ते सुरक्षेसाठी असलेली संयुक्त जबाबदारी अधिक ठळकपणे समोर आली.
हा महिनाभराचा रस्ते सुरक्षा अभियान वॉकहार्ट हॉस्पिटल्सची समाजाच्या आरोग्य व सुरक्षिततेप्रती असलेली सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करतो. वैद्यकीय सेवांसोबतच जनजागृती, प्रतिबंध आणि सहकार्याच्या माध्यमातून सुरक्षित व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
