सर्कस रद्द झाल्याने भूमिपुत्र मैदान खेळाडूंसाठी पुन्हा खुले – संजय केळकर
अनिल ठाणेकर
ठाणे: आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारातून आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून अतिक्रमणमुक्त झालेले भूमिपुत्रांचे मैदान नियोजित सर्कशीमुळे दोन महिने शेकडो खेळाडूंसाठी बंद होणार होते. मात्र संजय केळकर यांच्या दणक्याने सर्कस रद्द करण्यात आली असून खेळाडूंनी जल्लोष केला आहे.
पाच वर्षांपूर्वी अतिक्रमण आणि कचऱ्यामुळे कळव्यातील भूमिपुत्र मैदानाची दुरावस्था झाली होती. भविष्यात तेथे कचऱ्याचे डम्पिंग निर्माण होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत होते. हे मैदान मोकळे झाल्यास कळव्यातील शेकडो मुलांना, खेळाडूंना हक्काचे मैदान मिळणार होते. आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी लोकचळवळ सुरू केली आणि लोकसहभागाचे आवाहन केले. फोर्टी प्लस टीमचे रणजीत पाटील, अशोक भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह येथील नागरिकांनी प्रतिसाद देत लोकसहभागातून ही मैदान मोकळे करण्यात आले. गेली चार वर्षे या मैदानात सुमारे ५०० विद्यार्थी आणि खेळाडू या मैदानाचा लाभ घेत असल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली.ही जागा जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने एका सर्कशीला दोन महिन्यांसाठी हे मैदान देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ही बाब तेथील नागरिकांनी आणि खेळाडूंनी  केळकर यांच्या कानी घालून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.  केळकर यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. ही सर्कस रद्द झाल्याने शेकडो खेळाडूंना हे मैदान पुन्हा मोकळे झाले असून त्यांनी जल्लोष केला आहे. हे मैदान लोकसहभागातून निर्माण झाले असून त्याचा वापर खेळासाठी आणि खेळाडूंसाठीच व्हावा असा आग्रह मी प्रशासनाकडे धरला आहे. यापुढे खेळाशिवाय हे मैदान इतर कारणांसाठी वापरण्यात येऊ नये, अशी सूचनाही प्रशासनाला केल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *