आता भविष्याचे आव्हान
अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या बातमीमधून अद्याप न सावरलेल्या नेत्यांपुढे नवा प्रश्न उभा ठाकतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यावर चर्चा अपेक्षित होती; परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर आता लगेच त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय, असा विचार सुरू झाला आहे. दादांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातला एक महत्वाचा मोहरा अचानक अस्तंगत झाला. या घटनेने तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतोनात नुकसान केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आता पक्ष सक्षमतेने सांभाळण्याच्या परिस्थितीत दिसत नाहीत. एक धुरीण म्हणून ते अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व नक्कीच करतील, पण त्या पलिकडे जाऊन दोन्ही पक्षांमधील सर्व गट तट जोडणे, एका व्यासपिठावर आणणे आणि काळाला अपेक्षित असे हरहुन्नरी नेतृत्व देणे त्यांना या घडीला शक्य नाही. कदाचित म्हणूनच अजित पवार यांची उणीव मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. मागे वळून पाहताना तर त्यांच्या एकहाती करिष्म्यामुळे अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारले होते, हे स्पष्टपणे जाणवते. त्याला अर्थातच त्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्व कारणीभूत ठरले. या अनुषंगाने अनेक छोटी मोठी उदाहरणे देता येतात. अगदी अलिकडचे एक छोटे उदाहरण म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहता येईल. प्रचारासाठी जात असताना त्यांनी एक अपघात पाहिला तेव्हा तिथे थांबून अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात पाठवले. हे अपवादात्मक उदाहरण नाही. दादा असे माणुसकी जपणारे होते. त्यातूनच त्यांनी मोठा लोकसंग्रह केला आणि लोकनेता बनले.
अजितदादांनी जलसंपदा मंत्री या पदाची धुरा सांभाळताना, कार्यभार पाहताना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अत्यंत बारकाईने आणि गांभीर्याने अभ्यास केला होता. यातून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत होणारी घट आणि त्यातच राहणारी पावसाची अनियमितता यासारखे अनेक प्रश्न समोर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यावर तोडगा म्हणून धरण बांधकामाची सुरुवात, कॅनॉल, कालवे इत्यादी कामे त्यांनी प्राधान्याने पूर्णत्वाला नेली. याशिवाय ‌‘पाणी साठवण योजने‌’यासारख्या योजना राबवल्या. यामुळे पाण्याची अडचण दूर झाली. दादा जितके कठोर, तितकेच मिश्कील होते. खोरेनिहाय धरण, पाटबंधारे, पाणलोट यासंदर्भात सर्वांगीण विचार करताना दादांनी धडक कामे मार्गी लावली. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यावर चर्चा अपेक्षित होती; परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर आता लगेच त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय, असा विचार सुरू झाला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचीही वाताहत झाली आहे. अशा वेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का, त्याचे नेतृत्व कोण करेल असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. विलीनीकरणाचा निर्णय तूर्त बाजूला ठेवला, तरी उपमुख्यमंत्री म्हणून रुजू झालेल्या सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या तसेच अन्य जबाबदाऱ्या पेलू शकतील का, याबाबत संभ्रम आहे.
अजित पवार यांच्यानंतर पक्षाला सक्षम, दूरदृष्टी असलेले आणि जनतेशी थेट संवाद साधू शकणारे नेतृत्व आवश्यक आहे. युवा नेतृत्वाला संधी देणे, नव्या पिढीशी संवाद वाढवणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, हे अत्यावश्यक ठरणार आहे. केवळ घराणेशाहीवर अवलंबून राहून पक्ष दीर्घकाळ टिकू शकणार नाही, हे वास्तव नेतृत्वाने ओळखणे गरजेचे आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा आपल्या मूळ विचारधारेकडे वळावे लागेल. शेती, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय आणि सहकार क्षेत्रातील काम ही पक्षाची ओळख राहिली आहे; मात्र अलीकडच्या काळात ही ओळख काहीशी फिकी पडली आहे. ती पुन्हा मजबूत करण्यासाठी ठोस धोरणे आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सातत्यपूर्ण लढा आवश्यक आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस टिकून राहायची असेल, तर अंतर्गत मतभेद मिटवणे, विश्वास पुनर्स्थापित करणे आणि जनतेमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे गरजेचे आहे. अन्यथा, हा पक्ष केवळ इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणूनच ओळखला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य नेतृत्वाच्या परिपक्वतेवर, संघटनशक्तीवर आणि जनतेशी असलेल्या नात्यावर अवलंबून असेल. योग्य दिशेने पावले टाकली, तर पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो; अन्यथा, त्याची राजकीय ताकद हळूहळू कमी होत जाईल.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अजितदादा नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसले. कर्जमाफी, नुकसानभरपाई, पीक विमा योजना अशा विषयांवर त्यांनी वेळोवेळी सरकारवर दबाव आणला. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांची कायम लोकप्रियता राहिली. राजकारणात अनेकदा नेते संभ्रमात राहतात; मात्र अजित पवार यांनी नेहमीच स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. नेतृत्व म्हणजे सर्वांनाच खूश करणे नसते, तर योग्य वाटणारा मार्ग निवडणे असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले होते. सरकारी फाईलींचा ढीग न करता निर्णय त्वरित घेणे, अधिकाऱ्यांकडून वेळेत काम करून घेणे हा त्यांचा स्वभाव होता. काही वक्तव्ये, काही निर्णय आणि सत्तासंघर्ष यामुळे ते टीकेचे धनी झाले होते; मात्र त्यांनी कधीही टीकेमुळे काम थांबवले नाही. लोकशाहीमध्ये टीका अपरिहार्य असते. त्यातून शिकत पुढे जाणे, हीच परिपक्व नेतृत्वाची खूण असते. अजित पवार यांनी स्वतःला वेळोवेळी बदलत, सुधारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या पदावर असूनही त्यांनी जनतेशी असलेला संपर्क तुटू दिला नाही. त्यांच्या वाटचालीत चढ-उतार आले, वाद झाले, टीका झाली; पण काम करण्याची जिद्द मात्र कायम राहिली. आजच्या राजकारणात केवळ घोषणांची गर्दी दिसते. प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे नेते दुर्मिळ होत चालले आहेत. त्यात अजित पवार होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *