कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शाश्वत विकासावर भर देवून शहराचा विकास करण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल, यांचा मानस आहे. तसेच महापालिका क्षेत्रात लोकोपयोगी उपक्रम हे कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून कामे हाती घेण्यात यावी व त्यासाठी महापालिका अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे महापालिका आयुक्त यांचे धोरण आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सहजानंद चौक कल्याण (प) येथे तिसरा सोलार हायमास्ट हा मे. बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने कॉरपोरेट सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध करुन दिला असून सोलार हायमास्ट फिटींग्सचे लोकार्पण सोमवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याहस्ते संपन्न झाले. उदघाटनावेळी विद्युत यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उप अभियंता भागवत पाटील व मे. बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचे रिजनल हेड सरोज कुमार व ओरीया हेड तरण कोहली उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात आतापर्यंत तीन सोलार हायमास्ट कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून उभारण्यात आलेले आहेत. कल्याण (प) गणपती चौक गांधारे, इंदिरानगर चौक डोंबिवली (पूर्व) व सहजानंद चौक, कल्याण (प) या ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. सोलार हायमास्ट हे सुर्याच्या किरणांवर कार्यान्वित होणार असून त्यास विजेची गरज नाही तसेच महावितरण कंपनीची विज खंडीत झाल्यानंतर सुध्दा हे सोलार हायमास्ट कार्यान्वित राहतील, त्यामुळे चौकात प्रकाश राहणार असल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील १४४ हायमास्ट पैकी उर्वरीत १४१ हायमास्ट हे सोलार हायमास्ट करण्यासाठी  नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *