प्रकल्पांमुळे पालघर मधील रस्त्यांची दुरवस्था
आमदार राजेंद्र गावित यांनी घेतला आढावा
गुरुवारी प्रस्तावासह उपस्थित राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
योगेश चांदेकर
पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातील पालघर व डहाणू या दोन तालुक्यात विरार- डहाणू रेल्वे प्रकल्पाच्या चौपदरीकरणामुळे तसेच बुलेट ट्रेन व मुंबई-वडोदरा रेल्वे मार्गामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र गावित यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली; परंतु यातील निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्याने आ. गावित यांनी गुरुवारी या प्रकल्पासंबंधीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्तीच्या प्रस्तावासह हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग तसेच विरार-डहाणू रेल्वेचे चौपदरीकरण अशी विविध कामे सुरू आहेत. या कामांसाठी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात या भागातील रस्त्यावरून सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आ. गावित यांनी स्वतः या परिसरातील सात-आठ रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पालघर येथील शासकीय विश्रामगृहावर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
रस्त्यांच्या कामाचा आढावा
या बैठकीला पालघरचे प्रांताधिकारी शाम मदनूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय जाधव, डहाणू अभियंता पगारे, विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणाचे अभियंता मोरे, चव्हाण, हे काम करीत असलेल्या ‘एल अँड टी’ कंपनीचे अधिकारी अमोल घारा, के. राधाकृष्ण, श्रमिक गोस्वामी, अनुप पाटील, कमारेच्या सरपंच वैशाली पडवळे, उपसरपंच संदीप चव्हाण, उपसरपंच रोहन वेडगा, कपासेचे सरपंच प्रकाश कोम आदी उपस्थित होते. या बैठकीत रस्त्याच्या दुरुस्तीवर चर्चा झाली.
नागरिकांना त्रास
पालघर विधानसभा मतदारसंघातील चंद्रनगर, वाणगाव कपासे, केववे आदी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे रस्ते दैनंदिन वापराचे असून या रस्त्यांवरून विद्यार्थी, शिक्षक पालक तसेच अन्य नागरिक प्रवास करत असतात. विविध विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कंपन्या निघून जातील आणि रस्त्याची दुरवस्था मात्र तशीच राहील, असे आ. गावित यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, त्याच्या खर्चाची तरतूद सध्याच्या प्रकल्प खर्चातून करावी किंवा सामाजिक दायित्व निधीतून या रस्त्यांची कामे करावीत, अशा सूचना आ. गावित यांनी सर्वांना दिल्या.
अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
या वेळी अधिकाऱ्यांनी यातील प्रश्न आमच्या अखत्यारित नाहीत, असे सांगितल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित अधिकारी पत्र पाठवून त्यांना गुरुवारच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगावे, या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, निधीची तरतूद आदी तपशील घेऊन यावा असे निर्देश आ. गावित यांनी दिले असून अधिकाऱ्यांना एक प्रकारचा अल्टिमेटम दिला आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत काय निर्णय होतो, याकडे आता या भागातील सरपंच, उपसरपंच, व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोट
‘पालघर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची विविध विकास प्रकल्पांसाठीच्या अवजड यंत्रणांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला; परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता तातडीची बैठक घेतली. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे रस्त्याची किती दुरवस्था झाली, हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे. आता अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला असून गुरुवारी या संदर्भात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग काय करणार, त्यासाठी निधीची कशी तरतूद करणार याचे प्रस्ताव घेऊन येण्यास सांगितले आहे.’
राजेंद्र गावित, आमदार, पालघर
