ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने
राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब ढाकणे यांचा सत्कार
नवी मुंबई: नवी मुंबई सानपाडा येथे राहणारे आणि भायखळा येथील मुंबई पोलिस विभागाच्या संरक्षण आणि सुरक्षा खात्यात पोलीस उप उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले बाबासाहेब नाथा ढाकणे यांना प्रजासत्ताक दिनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा ३१ जानेवारी २०२६ रोजी सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आनंद मेळाव्यात माजी नगरसेवक शंकरराव माटे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या आनंद मेळाव्यात १०६ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले, अशी माबिती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील चुंभाळी या खेड्यात शेतकरी कुटुंबात बाबासाहेब ढाकणे यांचा जन्म झाला. आई-वडिलांनी शेती आणि ऊसतोड करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. ४ नोव्हेंबर १९९२ त्यांना मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून नोकरी मिळाली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाला नेहमी सहकार्य करणारे सानपाडा मधील माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, उत्कर्ष व उन्नत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.हनुमंत रांजणे, उत्कर्ष पतपेढीचे सीईवो मानकुमरे त्याचप्रमाणे योगाचे महत्त्व सांगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती घेऊन ‘ज्येष्ठांनो आपले आरोग्य सांभाळा’ असा चांगला संदेश देणाऱ्या न्यूज स्टोरी टुडेच्या निर्मात्या अलका भुजबळ व संपादक देवेंद्र भुजबळ या सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब ढाकणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी मुंबईमध्ये विविध पोलीस ठाण्यात खूप परिश्रम घेऊन प्रामाणिकपणे व निष्ठेने मी काम केले. आत्तापर्यंत माझ्या २०९ चांगल्या नोंदी असल्याची मला प्रशस्तीपत्रक मिळाली आहेत. मी यापुढेही जनतेची प्रामाणिकपणे सेवा करील. या मेळाव्याला माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, उन्नत संस्थेचे अध्यक्ष हनुमंत रांजणे, संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांची ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर भाषणे झाली. संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी नवीन सभासदांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले, सर्व वाढदिवस मानकऱ्यांच्या वतीने संघाचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाच्या उपाध्यक्ष सीमा बोराडे यांनी गायन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी देणगीदारांचे अभिनंदन करून सर्वांचे आभार मानले.
