वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्राची ३,२४४ कोटींची तरतूद
राज्य सरकारही तेवढाच निधी देणार..!
आचारसंहिता संपताच भूसंपादन…!
कणकवली(प्रतिनिधी)– वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ३ हजार २४४ कोटी रुपयांची तरतूद केली असून तेवढीच रक्कम आता राज्य सरकार आपल्या अर्थसंकल्पात करणार आहे.त्यामुळे गेली अनेक वर्ष रखडलेला हा रेल्वे मार्ग आता मार्गी लागणार आहे. निवडणूक आचारसंहिता संपताच या मार्गासाठीच्या भूसंपादनाचे काम सुरू होईल अशी माहिती सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या रेल्वे मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार असून त्यामुळे विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.
केंद्रीय अर्थसंकल्पात कोकणच्या विकासाला चालना देणारे कोकणच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यासाठी निधीची तरतूद ही करण्यात आल्याचे सांगून राणे म्हणाले,मच्छीमारांसाठी नवीन तलाव,नारळ प्रोत्साहन योजना, काजू ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ‘प्रीमियम ब्रँड ‘तयार करणे आदींचा समावेश आहे.
वैभववाडी -कोल्हापूर मार्गाबाबत बोलताना राणे पुढे म्हणाले की हा मार्ग गेली अनेक वर्ष रखडला होता.केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ३ हजार २४४ कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद केली आहे.आणि तेवढीच रक्कम राज्य सरकार देणार असून हा मार्ग आता लवकरात लवकर निश्चितपणे पूर्ण होणार आहे.या रेल्वेमार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीचे नवे दालन खुले होणार आहे.जिल्ह्यात अनेक नवीन उद्योग उभारले जाणार असून रोजगार ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला. या रेल्वे मार्गाला पुढील काळात बंदरेही जोडली जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
असा आहे रेल्वेमार्ग
या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण २०१६ मध्ये झाले.त्यानुसार हा मार्ग वैभववाडी,सोनाळी, कुंभारवाडी, कुसूर,उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी(ता.वैभववाडी),सैतवडे, कळे, भुये, कसबा – बावडा, मार्केट यार्ड (कोल्हापूर),असा आहे. या मार्गावर २६ बोगदे,५ उड्डाण पूल आणि १० स्थानके असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *