मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दु:खातून अद्यापही महाराष्ट्र सावरलेला नाही. अजित पवारांचे राजकारणातील सर्वेसर्वा असणारे शरद पवार आज बारामतीत आले, आपल्या लाडक्या पुतण्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवारांनी थरथरत्या हातांनी फुले उचलली अन् अवघ्या बारामतीकरांना अश्रु अनावर झाले. ओंजळीतील फुलांना अश्रुंचा स्पर्श झाला आणि अवघा परिसर अजित पवारांच्या आठवणीत हरवून गेला.
बारामतीमधील अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सह्योग सोसायटीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि खासदार शरद पवार यांनी येऊन अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांचे संपूर्ण कुटुंब येथे होते.
थरथरत्या पाऊलांनी पुढे येत, सुरक्षा रक्षकाच्या हाताला हात धरुन शरद पवार पुढे आले. त्यानंतर, अजित पवारांच्या प्रतिमेसमोर डोकं खाली करुन हात जोडले. आपल्या लाडक्या पुतण्याला काकांकडून श्रद्धांजली वाहतानाचा हा क्षण सगळ्यांच्या काळजाला हात घालणारा होता. यावेळी, संपूर्ण पवार कुटुंबीय भावुक झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, शरद पवार, जय पवार, नीता पाटील, विजया पाटील, श्रीनिवास पवार, रोहित, राजेंद्र, रणजित पवार याठिकाणी उपस्थित होते.
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची त्यांच्यासोबतची ही पहीलीच भेट आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या कुटुंबीयांसोबत यावेळी शरद पवार यांनी चर्चा केली.
दरम्यान, शरद पवार मुंबईहून आज बारामतीत दाखल झाले. विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांची पार्थ आणि जय पवार यांच्यासह बैठकही झाली. या बैठकीला विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांचीही उपस्थिती होती, शरद पवारांची जय-पार्थ आणि विजया पाटील यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
