अपयशात दिसला आशेचा किरण
अलिकडे इस्रो’च्या दोन मोहिमा अयशस्वी झाल्या. ‘इस्त्रो’च्या माध्यमातून परकीय चलन मिळवून देशाला अर्थकारणाचे नवे साधन मिळवून देताना हे अपयश चिंताजनक ठरले. मात्र याच सुमारास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अयशस्वी पीएसएलव्ही-सी 62 मोहिमेतील स्पेनच्या ‘ऑर्बिटल पॅराडाइम’चे किड नावाचे उपकरण अंतराळयानापासून यशस्वीरित्या वेगळे झाले आणि पृथ्वीवर डेटा प्रसारित करण्यासदेखील सुरुवात केली.
पृथ्वीवर लक्ष ठेवणारा म्हणजेच निरीक्षण करणारा उपग्रह, इतर उपकरणे आणि 16 पेलोड घेऊन जाणारे भारतीय रॉकेट अलिकडेच प्रक्षेपणानंतर आपल्या नियोजित मार्गावरून भरकटले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’च्या विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या प्रक्षेपण यानासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. ‘पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल’ला (पीएसएलव्ही) अवघ्या आठ महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा अपयश आले आल्यामुळे विश्वासार्हतेला धक्का बसला. आतापर्यंतच्या सुमारे 60 पैकी 90 टक्क्यांहून अधिक मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत. ‘पीएसएलव्ही-सी62’ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केले. या रॉकेटमधून इओएस-ए1 निरीक्षण उपग्रहासह भारत आणि परदेशातील स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांनी विकसित केलेले आणखी 15 पेलोड नेले जात होते. ‘इस्रो’च्या ‘मिशन कंट्रोल’नुसार उड्डाणाच्या बहुतांश वेळेत रॉकेटची कामगिरी सामान्य होती; मात्र नंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि रॉकेट आपल्या मार्गावरून भरकटले. ‘पीएसएलव्ही-सी62/इओएस-एन1’ मोहिमेदरम्यान रॉकेटच्या उड्डाणमार्गात विचलन दिसून आले. ज्या मार्गाने मिशन पुढे जाणे अपेक्षित होते, त्या मार्गावर ते पुढे जाऊ शकले नाही. ‘पीएसएलव्ही’ हा भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा आधार आहे. याच रॉकेटने चांद्रयान-1 आणि आदित्य-एल1 सौर वेधशाळेसारख्या महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे प्रक्षेपित केल्या आहेत. दरम्यान, ‘इस्रो’च्या एका प्रक्षेपणाद्वारे आकाशात झेपावलेल्या स्पेनच्या ‘स्टार्टअप ऑर्बिटल पॅराडाइम’ने याच सुमारास आश्चर्यचकित केले.
गेल्या वर्षी ‘पीएसएलव्ही-सी61’ मिशन अपयशी ठरल्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि त्रुटी दुरुस्त केल्याचे सांगण्यात आले होते; मात्र प्रत्येक रॉकेट आणि प्रत्येक मोहीम वेगळी असते. ‘पीएसएलव्ही-सी62’चे अपयश ‘इस्रो’साठी मोठा धक्का आहे. या वेळी सात देशांचे उपग्रहही या मोहिमेत होते आणि या अपयशामुळे ते सर्व नष्ट झाले. ‘इस्रो’च्या प्रतिमेला यामुळे धक्का बसला असला, तरी ‘इस्रो’ भविष्यात ही मोहीम अधिक ताकदीने पूर्ण करेल. ‘पीएसएलव्ही’ हे खूप चांगले रॉकेट आहे. आतापर्यंत याच्या 64 उड्डाणांपैकी फक्त पाचच अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अपयश आले, तरी त्याने खचून जाण्याचे काहीच कारण नाही. मागील मोहिमेमधील त्रुटी दूर करून हे रॉकेट लवकरच पुन्हा लाँच केले जाईल, अशी अपेक्षा आहे. मागच्या अपयशानंतर ‘इस्रो’ने नंतर सुमारे आठ महिन्यांसाठी सर्व ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपणे थांबवली आणि या काळात कठोर गुणवत्ता नियंत्रणाचे उपाय राबवले गेले. तिसऱ्या टप्प्याचे डिझाइन मजबूत केल्याचे सांगण्यात आले, तरी या वेळीही अपयश आले. मागील वर्षीच्या मिशनच्या अपयशाचे कारण इंजिनच्या कम्बशन चेंबरमधील (ज्वलन कक्षातील) दाब अचानक कमी होणे हे होते; मात्र ‘फेल्युअर ॲनॅलिसिस कमिटी’चा अहवाल जाहीर करण्यात आला नाही. सोमवारी झालेल्या अपयशाचे कारण अद्याप स्पष्ट नाही; पण तेही अशाच प्रकारचे असू शकते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अयशस्वी पीएसएलव्ही-सी62 मोहिमेतील एक असलेल्या ‘किड’ने मात्र महत्वाची माहिती नोंदवली आहे. जगाने गृहीत धरले, की ‘इस्रो’चे अभियान पूर्णपणे अयशस्वी झाले आहे आणि कोट्यवधी रुपये किमतीचे उपग्रह अवकाशाच्या अंधारात हरवले; परंतु आशेच्या एका छोट्या किरणाने सर्वांना आश्चर्यचकित केले. स्पेनच्या ‘ऑर्बिटल पॅराडाइम’ने म्हटले आहे, की त्यांचे ‘केस्ट्रेल इनिशियल डेमॉन्स्ट्रेटर’ (किड) हे इस्रोने प्रक्षेपित केलेले उपकरण अंतराळ यानापासून केवळ यशस्वीरित्या वेगळे झाले नाही, तर पृथ्वीवर डेटा प्रसारित करण्यासदेखील सुरुवात केली. ‘ऑर्बिटल पॅराडाइम’ अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जे अवकाशाचे औद्योगिकीकरण सक्षम करू शकते. त्याचे प्राथमिक उद्दिष्ट अवकाशातून पृथ्वीवर वारंवार, कार्यक्षम आणि सुलभ उड्डाणे प्रदान करणे आहे. ‘किड’ हा कंपनीच्या प्रस्तावित वाहन, कर्नलचा एक नमुना आहे, एक स्केल-डाउन आवृत्ती आहे. कर्नल कक्षामधून पृथ्वीवर 120 किलोग्रॅमपर्यंतचे पेलोड परत आणण्यासाठी डिझाइन केले जात आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि ‘सीईओ’ फ्रान्सिस्को कॅचियाटोर यांच्या मते ‘किड’च्या प्रक्षेपणाचा उद्देश वातावरणीय पुनर्प्रवेशाच्या कलेवर प्रभुत्व मिळवणे हा होता. त्यांनी स्पष्ट केले, की अंतराळयानाने अंतराळातून परत येताना पृथ्वीवर अनुभवलेल्या परिस्थिती पुन्हा निर्माण करणे अशक्य आहे. म्हणूनच, भविष्यातील अंतराळ कार्गो मोहिमांमध्ये ‘किड’चा डेटा कंपनीसाठी एक मैलाचा दगड ठरेल.
13 जानेवारी रोजी सकाळी अंदाजे 44.4 मीटर उंच असलेले चार-टप्पे असलेले ‘पीएसएलव्ही सी-62’ रॉकेट नियोजित वेळेनुसार प्रक्षेपित करण्यात आले. ‘ईओएस-एन1’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मोहिमेचा उद्देश प्रामुख्याने एक प्राथमिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि अनेक सहप्रवासी उपग्रह 512 किलोमीटर उंचीच्या सूर्य-समकालिक कक्षेत ठेवणे हा होता. संपूर्ण उड्डाण कालावधी अंदाजे 17 मिनिटे होता. प्रक्षेपणाचे सुरुवातीचे टप्पे सामान्य होते. ‘मिशन कंट्रोल सेंटर’कडून शास्त्रज्ञांनी सतत रिअल-टाइम अपडेट्स दिले आणि पहिल्या दोन टप्प्यांसाठी सर्व काही योजनेनुसार चालले असल्याचे दिसून आले. तथापि, रॉकेटचा तिसरा टप्पा (पीएस 3) सक्रिय घोषित झाल्यानंतर परिस्थिती बदलली. या टप्प्यादरम्यान रॉकेटच्या उड्डाणमार्गात एक अडथळा दिसून आला. ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले, की तिसऱ्या टप्प्यात ‘स्ट्रॅप-ऑन मोटर्स’च्या जोरावर, रॉकेटला त्याच्या उड्डाणमार्गात अडथळा आणि विचलनाचा अनुभव आला. यामुळे रॉकेट त्याच्या इच्छित उंचीवर आणि कक्षेत पोहोचू शकले नाही. या मोहिमेत समाविष्ट असलेल्या 16 उपग्रहांपैकी 15-परदेशी पृथ्वी निरीक्षण पेलोडसह-त्यांच्या इच्छित कक्षेत स्थान मिळवण्यात अयशस्वी झाले; परंतु ‘ऑर्बिटल पॅराडाइम’चा ‘किड’ एक वेगळीच कथा बनला. अडथळ्यांना न जुमानता, ‘किड’ ‘पीएसव्हीएल सी 62’पासून वेगळे झाले, चालू झाले आणि डेटा प्रसारित केला.
‘किड’ हा प्रत्यक्षात ‘री-एंट्री व्हेईकल’चा एक छोटा नमुना आहे, जो तांत्रिक चाचणी म्हणून मोहिमेत समाविष्ट करण्यात आला होता. या मोहिमेत अनेक महत्त्वाचे भारतीय आणि परदेशी उपग्रह होते. ते अयशस्वी झाले. अयशस्वी उपग्रह आता अवकाशातील कचऱ्याच्या रूपात अवकाशात वाहून जाऊ शकतात, परंतु ‘किड’ चे यश अपयशामध्येही शिकण्यासाठी आणि आशेसाठी जागा असते, हे दर्शवते. येत्या काही दिवसांमध्ये ‘इस्रो’च्या तपास अहवालातून तिसऱ्या टप्प्यात काय चूक झाली आणि भविष्यात अशा घटना कशा टाळता येतील हे स्पष्ट होईल. खासगी स्टार्टअप कंपन्यांनी बनवलेले पेलोड वाहून नेणारे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची मोहीम अयशस्वी होण्याची ही पहिलीच वेळ होती. हा उपग्रह धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असण्याची अपेक्षा होती. एका अर्थाने तो केवळ सीमा सुरक्षेसाठी डोळा म्हणून काम करणार नव्हता, तर मातीचे प्रकार उघड करून शेतीतही क्रांती घडवून आणणार होता. आता आपल्या लष्करी देखरेख क्षमता वाढवण्याच्या उद्दिष्टाला विलंब होण्याची भीती आहे. परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात अपयश आल्याने ‘इस्रो’च्या जागतिक व्यावसायिक बाजारपेठेवरही परिणाम होऊ शकतो. मात्र, अंतराळ संशोधन ही एक सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत, यश आणि अपयश स्वाभाविक आहे.
‘पीएसएलव्ही-सी 62’ च्या अपयशाच्या गंभीर समस्येमुळे अमेरिकन नेव्हिगेशन सिस्टीमवरील आपले अवलंबित्व वाढेल. ‘पीएसएलव्ही’ पुन्हा उड्डाण करण्यासाठी किमान सहा महिने घेईल. यामुळे आपल्या इतर अनेक मोहिमांचा वेग मंदावू शकतो, तरीही चांद्रयान-1, मंगळयान आणि आदित्यसारख्या यशदायी योजना राबवणाऱ्या संस्थेकडून देशाच्या खूप अपेक्षा आहेत. ‘इस्त्रो’ ने अपयशांना आव्हान म्हणून वारंवार स्वीकारले आहे आणि दुप्पट ताकदीने उभे राहिले आहे. हे आव्हान अवकाश शास्त्रज्ञांसाठी नवीन सुधारणा करण्याची संधी आहे.
खास बात
जनार्दन पाटील
(अद्वैत फीचर्स)
