मेघालयात कोळसा खाणीत

भीषण स्फोट ; १६ मजुरांचा मृत्यू

शिलाँग : मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका बेकायदेशीर कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला असून या स्फोटात आतापर्यंत १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. डायनामाईट फुटल्यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस व बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून मदत व बचावकार्य जोरात सुरू आहे. या दुर्घटनेत अनेक लोक खाणीत अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात पोलिस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, ही घटना थेंग्स्कू भागात घडली आहे. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका व्यक्तीला ७० टक्के भाजल्यामुळे उपचारासाठी शिलॉंगला पाठवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी राज्य मदत पुनर्वसन पथकाची मदत मागितली आहे.

बचाव पथकांचे काम युद्धपातळीवर सुरू असून खाणीत नेमके किती लोक अडकले आहेत, याची अचूक माहिती अद्याप समोर आलेली नाही. जखमी व्यक्तींना शिलॉंग येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बेकायदेशीर कोळसा खाणींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *