संजय व प्रतिभा गोखलेंची मुंबई मराठी पत्रकार संघाला एक लाखांची देणगी

मुंबई : ज्येष्ठ संपादक कै. विद्याधर गोखले यांचे चिरंजीव संजय विद्याधर गोखले आणि त्यांची पत्नी प्रतिभा संजय गोखले यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाला भेट देऊन रुपये एक लाखांची देणगी प्रदान केली. मराठी पत्रकारिता, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीप्रती असलेल्या आपल्या जिव्हाळ्याची ही भावना असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

कै. विद्याधर गोखले यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ललित लेखनासाठी दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी सदर ठेवीचा वापर करण्यात यावा, अशी सूचना संजय व प्रतिभा गोखले यांनी केली.

नाटक हा कै. विद्याधर गोखले यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. याच अनुषंगाने मुंबई मराठी पत्रकार संघाने यंदा ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन ‘निष्पाप’ हे नाटक सादर केले होते. तसेच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नाट्यशुक्रवार’ या प्रायोगिक रंगभूमीवरील उपक्रमाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त करत कौतुकाने विचारणा केली.

संजय व प्रतिभा गोखले यांच्याकडून देणगी स्वीकारताना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि अंतर्गत हिशेब तपासनीस हेमंत सामंतही उपस्थित होते.

या उदार योगदानाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने संजय व प्रतिभा गोखले यांचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी मनःपूर्वक आभार मानले.

फोटो ओळ

संजय विद्याधर गोखले आणि प्रतिभा संजय गोखले यांच्याकडून रुपये एक लाखांची देणगी स्वीकारताना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण. सोबत उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि अंतर्गत हिशेब तपासनीस हेमंत सामंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *