अभिनव कॉलेजचा स्पंदन उत्सव उत्साहात संपन्न
मिरा -भाईंदर – विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अभिनव कॉलेजच्या वतीने दरवर्षी स्पंदन उत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी या उत्सवाचे आयोजन मिरा रोड येथील लता मंगेशकर नाट्यगृहात उत्साहात सुरू झाला. हा उत्सव पहिल्यांदाच लता मंगेशकर नाट्यगृहात झाल्यामुळे विद्यार्थ्यांत उत्साह जाणवत होता. दीप प्रज्वलन करून या उत्सवाचे उद्घाटन अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आहे. प्राचार्य डॉ. ऑलविन मेनेजिस यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी विष्णू पाटील, प्रकाश पाटील, प्रभात पाटील, किरण पाटील, चिंतामण पाटील श्रीजा पाटील यांची उपस्थिती लाभली. मिस्टर अभिनव आणि मिस अभिनवचा मुकुट अनुक्रमे आदित्य सोनावणे व तन्मयी पाटील यांनी पटकावला. त्यांचा संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी नृत्य आणि गायन कलेतून आपली निपुणता दाखवली. नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजेश म्हात्रे तर गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून कुशल म्हात्रे यांनी काम पाहिले. वक्तृत्व , वादविवाद, काव्यवाचन व निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. प्रज्ञाकिरण वाघमारे, ऑन द स्पॉट फोटोग्राफीचे प्रा. गिरीश साळवे, तर फाईन आर्ट्सचे परीक्षक म्हणून नितेश भोईर,सौ. शिल्पा म्हात्रे, प्रा.भरत राठोड, सौ.ज्योती पाटील यांनी काम पाहिले. एकूण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैष्णवी पाटील तसेच प्रा.उत्तम भगत यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.स्पंदन उत्सवाला सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उल्लेखनीय होता. स्पंदन उत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी- शिक्षक परिषद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.
