गडचिरोलीत सी-६० पोलिसांची मोहीम ० ७ नक्षलवादी ठार ० महाराष्ट्राचे जवान दिपक मडावी शहीद
गडचिरोली : नक्षलवाद्यांमध्ये कुख्यात असणाऱ्या कंपनी १० चा गडचिरोली पोलिसांनी आज खात्मा केलाय. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या अबुझमाड दुर्गम भागात आणि घनदाट अरण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने चकमकीत ७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. मागील तीन दिवसांपासून ही चकमक सुरु आहे. या कारवाईत गडचिरोली नक्षल विभागीय समितीचा प्रभारी आणि २५ लाखांचे बक्षीस असलेला जहाल नक्षल नेता प्रभाकर याच्यासह सात नक्षलवादी ठार झाले आहेत. मात्र, नक्षलवाद्यांशी झालेल्या जोरदार चकमकीत अहेरी तालुक्यातील मांडा येथील सुपुत्र जवान दीपक मडावी (३८) शहीद झाले आहेत.
भामरागड तालुक्यातील फोडेवाड़ा परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांच्या ‘कंपनी क्रमांक १०’चे सदस्य तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३ फेब्रुवारी रोजी पोलिस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या १४ पथकांनी शोधमोहीम हाती घेतली. ४ फेब्रुवारी रोजी नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. नक्षलवाद्यांनी झाडी आणि डोंगराळ भागाचा फायदा घेत जवानांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
दोन दिवस चाललेल्या या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले असून त्यामुळे नक्षलवाद्यांच्या कंपनी १० चे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केल्यानंतर घटनास्थळावरून जवानांनी युद्धसाहित्य आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. यात १ एके-४७ रायफल, १ एसएलआर रायफल, १ .३०३ रायफल, मोठ्या प्रमाणात काडतुसे तसेच पिट्टू (साहित्य) जप्त करण्यात आले आहे.
या चकमकीत शहीद झालेले जवान दीपक मडावी यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी दोन नक्षलवाद्यांना टिपले. मात्र समोरून आलेल्या गोळीने त्यांना वीरगती प्राप्त झाली. या चकमकीत दुसरे जवान जोगा मडावी हे देखील जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
चौकट
शहीद मडावींच्या कुटुंबीयाना
२.२५ कोटींची आर्थिक मदत
राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि माओवादाला समूळ उच्चाटनासाठी दीपक मडावी यांनी दिलेली ही सर्वोच्च आहुती आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांचे हे बलिदान कदापि व्यर्थ जाणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मडावी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह एकूण २.२५ कोटी रुपये अर्थसहाय्य तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येईल असे फडणवीस यांनी जाहीर केले.
