प्रकाशन व्यवसायातील मुद्रित शोधकाचे महत्त्व…

कालच्या दै बित्तंबातमीत एक बातमी प्रकाशित झाली होती. ती एका संघटनेची नवी कार्यकारिणी गठीत झाल्याबद्दलची बातमी होती. मात्र त्या बातमीत नव्या कार्यकारणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोटो प्रकाशित करण्याऐवजी सोबत एका खेळाडूंच्या टीमचा फोटो प्रकाशित केला होता. सहाजिकच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संपादकांना फोन केला. नंतर ती सुधारित फोटोसह बातमी आज प्रकाशित झालेली दिसली.
वृत्तपत्रांमध्ये असे प्रकार अनेकदा होतात. अर्थात असे करण्यात कोणाचाही कोणाचाही दुष्ट हेतू नसतो तर असे प्रकार अनावधानाने घडत असतात. मात्र त्यातून काही वेळा गमती घडतात तर काही वेळा गैरसमज देखील होतात.
मला आठवते खूप वर्षांपूर्वी नागपूरच्या दैनिक तरुण भारत मध्ये रात्रपाळीला दोन उपसंपादक होते. त्यातल्या एका उपसंपादकाच्या आईला एका निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याची बातमी लावायची होती. त्याचवेळी एक निधन वार्ता देखील आली. काही कारणाने त्या उपसंपादकाला अचानक थोड्या वेळासाठी घरी जावे लागले. त्यावेळी त्याने आपल्या सहका-याला सूचना दिल्या आणि तो घरी गेला. तासभराने तो कार्यालयात परत आला त्यावेळी ते पान लागलेले होते. त्यामुळे त्याने देखील पुन्हा न तपासता पुढल्या कामाला लागला.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याने पेपर उघडून पाहिला त्यावेळी त्याच्या आईच्या पुरस्काराची बातमी आलीच नव्हती आणि त्या निधन वार्तेच्या तिथे त्याच्या आईचा फोटो होता. तो पाहून त्याच्या आईचाच त्याला फोन आला आणि त्याला झोपेतून जागे केले. त्या दिवशी सर्वांना समजावून सांगता सांगता त्या उपसंपादकाची चांगलेच पुरेवाट झाली होती.
असे एकाची बातमी आणि दुसऱ्याचा फोटो असे प्रकार अनेकदा घडतात. मग कोणीतरी संबंधित त्या वृत्तपत्रात फोन करून कळवतो आणि मग ते सुधारले जाते. असे अनेकदा होते. मात्र त्याला काहीच इलाज नसतो. रात्रीच्या वेळी पान लावताना माणसाच्या हातून अनावधानाने या चुका घडत असतात.
जसे प्रकार फोटो बाबत होतात, तसेच मजकुराबाबतही होतात. अनेकदा बातमी कंपोज करताना एखादे अक्षर इकडले तिकडे होते आणि त्यातून अर्थाचा अनर्थ होतो. खूप वर्षांपूर्वी नाशिकहून प्रकाशित होणाऱ्या अमृत नामक मराठी मासिकात “मुद्राराक्षसाचा विनोद” म्हणून एक सदर असायचे. त्या काळात मुद्रणकला इतकी विकसित झाली नव्हती. आज संगणकाने अक्षरे जुळवली जातात. त्या काळात खिळे जुळवले जायचे आणि मजकूर तयार केला जायचा. तेव्हा चुका बऱ्याच व्हायच्या. मग जागरूक वाचकांनी अशा चुका शोधाव्या आणि ते संदर्भ आमच्याकडे पाठवावे, आम्ही ते प्रकाशित करू, असे अमृतचे संपादक आवाहन करायचे. आणि त्यांना अनेक वाचक प्रतिसाद द्यायचे. एका विणकर वस्तीत जातीय दंगली झाल्या. त्यामुळे तिथल्या विणकारांना सूत मिळत नव्हते. दोन दिवसांनी परिस्थिती निवळली आणि प्रशासनाने तिथे सुत विक्रीस प्रारंभ केला ही बातमी एका दैनिकाने छापताना तिथे ‘सू’ चा ‘मू’ केला आणि मग “मुत विक्रीस प्रारंभ” अशी बातमी प्रकाशित झाली.
मला आठवते नागपुरात एक शेवडे नमक सामाजिक कार्यकर्ते सक्रिय होते. एका वृत्तपत्रात त्यांच्या संदर्भात एक वृत्त प्रकाशित केले. त्याच्या शीर्षकातच त्यांच्या नावाचे शेवडे ऐवजी शेंबडे झाले होते. ते गृहस्थ त्या दिवशी अगदी संतापूनच त्या वृत्तपत्राच्या संपादकाकडे पोहोचले आणि घालायचा तो गोंधळ घातला. मात्र संपादकाने तांत्रिक चूक असल्याचे सांगून माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
पूर्वी मुद्रण करताना खिळे जुळवून मजकूर कंपोज केला जायचा. साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी ऑफसेट प्रणाली विकसित झाली. त्यात संगणकाच्या मदतीने कंपोझिंग केले जाऊ लागले. त्यामुळे काम सोपे झाले आहे. तरीही शेवटी काम करणारा माणूसच असतो. त्याच्या हातून चुका होऊ शकतात आणि त्या चुका जर काही कारणाने दुर्लक्षित राहिल्या, तर असे अर्थाचे अनर्थ होतात.
त्यामुळेच मुद्रण आणि प्रकाशन व्यवसायात मुद्रित शोधकाचे म्हणजेच प्रूफ रीडरचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा प्रुफ्र रिडर भाषेचे आणि एकूणच समाजाचे नेमके अध्ययन असणारा असावा लागतो. असा असला तर तो अशा छोट्या-मोठ्या चुका लगेचच दुरुस्त करतो. मात्र सध्या वृत्तपत्रांमध्ये मुद्रित शोधक हे पदच जवळजवळ नामशेष झाले आहे. कारण संगणकावर जो स्वतः कंपोज करतो त्यानेच आपण कंपोज केलेले पुन्हा तपासून घ्यावे असे अपेक्षित असते. मात्र ज्याने कंपोज केले त्याच्या हातून चूक होऊ शकते आणि अनेकदा कामाच्या व्यापात ती दुर्लक्षितच राहते. त्यामुळेच तिथेही मुद्रित शोधकाचे महत्व अधोरेखित होते.
म्हणूनच वृत्तपत्रीय क्षेत्रात नसले तरी प्रकाशन व्यवसायात मुद्रित शोधकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आज अनेक प्रकाशक त्यांच्याकडे प्रकाशित होणारी पुस्तके अगदी जाणकार मुद्रीत शोधकाकडूनच तपासून घेत असतात. ते मुद्रित शोधक देखील तितकेच तयार असतात. मला आठवते माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात एका कथेत काही ठिकाणी मी नायकाचा उल्लेख एकेरीत केला होता तर काही ठिकाणी मानाने केला होता. मला त्या मुद्रित शोधकाचा फोन आला आणि त्याने ही विसंगती लक्षात आणून दिली होती. मग त्याच्याशी चर्चा करून ती विसंगती आम्ही दूर देखील केली होती.
शेवटी माणूस हा माणूसच असतो. त्याच्या हातून चूक केव्हाही होऊ शकते, आणि ती त्याच्या लक्षात येत नाही. ती दुसऱ्याला पटकन लक्षात येते. म्हणतात ना, आपल्या डोळ्यातले मुसळ देखील दिसत नाही, मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ देखील पटकन दिसते. तसेच होते. त्यामुळेच आपल्या चुका दुरुस्त व्हाव्यात असे वाटत असेल तर त्या दुसऱ्या कोणीतरी तपासायलाच हव्यात. तेच आपल्या हिताचे असते.
त्यामुळेच मुद्रण प्रकाशन आणि वृत्तपत्र व्यवसायात मुद्रित शोधकाचे महत्व अनन्यसाधारण आहे… हे सहज सूचलं म्हणून सांगावसं वाटते.

सहज सुचलं म्हणून

अविनाश पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *