जेंव्हा मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिण्याची विनंती ज्यावेळी आली तेंव्हा एकूणच महाराष्ट्रच्या राजकारणाचा चाळीस वर्षांचा पट माझ्या समोर उभा राहील आणि त्यात एकनाथ शिंदे यांची पंचवीस वर्ष आहेतच. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय, विरोधकांना दिलेली धोबीपछाड, केलेले राजकीय तह आणि प्रसंगी दाखवलेला आक्रमकपणा त्यातून मला जे बुद्धीला आकलन झाले त्यातून मला स्पष्टपणे जाणवते की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणाऱ्या काळातील मराठा – बहुजन राजकारणाचा नवा पासवर्ड आहे.
हे समजून घेण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या फ्लॅश बँक मध्ये जाणे भाग आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाचा एक फॉर्म्युला होता, जो मराठा आणि दलित बहुजन युतीच्या अंगाने जातो. दुसरा जनसंघाचा फॉर्म्युला जो उच्चवर्णीय, धर्म आणि उद्योगपती युतीच्या यांच्याकडे जातो. भाजपचा पूर्वसूरी असलेला जनसंघ आणीबाणीच्या काळात जनता पार्टीत विलीन होऊन सर्व प्रथम स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात आला. याबाबत नंतर विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांत प्रचंड खल झाला आणि जनसंघाला सोबत घेणे जयप्रकाश नारायण यांची ही राजकारणातील सर्वात मोठी चूक होती, हे आता अनेक समाजवादी आणि साम्यवादी विद्वान मान्य करतात. जनता पार्टी मुळे संघाला मान्यता आणि ओपन कॅनव्हास उपलब्ध झाला. असे झाले तरी देशातील आणि महाराष्ट्रातील काँग्रेसी राजकारणाला काउंटर करेल असा फॉर्म्युला अद्याप जनसंघ अर्थात नंतरच्या भाजपच्या हातात आला नव्हता. तो रथयात्रा आणि राम मंदिर आंदोलनाने हातात आला. हे आंदोलन जस जसे देशात पसरू लागले आणि भाजपने आपल्या हातात असलेल्या प्रसार माध्यमाचा, संत आणि धार्मिक नेत्यांचा जो सफाईदार पणे वापर केले त्याने देशभरात भाजपचे नगरसेवक, आमदार निवडून येऊ लागले. भाजपचा हा फॉर्म्युला म्हणजे देशातील मतदार हा विकास,गरीब हटाव यांच्याऐवजी भारतीय हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र यांच्या मुद्दावर मतदार धर्माच्या नावाने भावना प्रधान होऊन मतदान करू शकतो, शिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव ओसरला होता, कॉँग्रेसी नेत्यांचे भ्रष्टाचार, लफडी बोफोर्सची दलाली असे विषय ऐरणीवर होतेच. भाजपच्या हातात या फॉर्मुल्याच्या रूपाने जणु काही अलाउद्दीनचा चिराग हाती आला आणि त्यांनी जिथे जिथे तो मोठ्या प्रमाणात वापरला तिथे त्यांच्या पदरात यश मिळू लागले यात उत्तरेकडील राज्य मोठ्या प्रमाणात प्रभावात आली. मात्र महाराष्ट्रात भाजपला अजूनही फार यश मिळत नव्हते. भक्कम पाया रोवण्यासाठी योग्य फॉर्म्युला आणि सोबत मिळत नव्हती. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाजपच्या मदतीला आले. भाजपचे नेते प्रमोद महाजन, लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांनी शिवसेनाप्रमुख यांची हिंदुत्ववादी आक्रमक नेता म्हणून जी प्रतिमा तयार झाली होती त्याचा योग्य वापर महाराष्ट्रात करण्यास सुरुवात केली. त्यातून “माधव” (माळी, धनगर आणि वंजारी ) हा फॉर्म्युला पुढे आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत युती आणि माधव फॉर्म्युला यामुळे भाजपचा सत्तेकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
शिवसेनाप्रमुखांच्या नंतरची शिवसेना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्र आली. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून काही शिवसेना नेते बाहेर गेले. जेव्हा विधानसभा निवडणूक झाली सेना भाजप युतीत लढली त्याचा निकाल बाहेर आला. त्या निकालाकडे बघता भाजप आपल्या मदती शिवाय सत्तेत येऊच शकत नाही असे उद्धव ठाकरे यांना ज्यावेळी उमजले. तेंव्हा त्यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात वेगळी मात्र पुरेसा होमवर्क न करता स्वताचाच कपालमोक्ष करणारी खेळी खेळली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेस सोबत आघाडी करून स्वतः मुख्यमंत्री बनून खुर्चीत बसले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि तत्वज्ञान याचा हवाला देत शिवसेने भूकंप घडवून आणला. शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे हे ४० आमदार आणि दहा खासदार यांना घेऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुढे आव्हान उभे केले. ज्यातून उद्धव ठाकरे अद्यापही सावरले नाही आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विद्रोह आणि त्यांच्या राजकारणाचे भवितव्य
मात्र आता प्रश्न उभा रहातो आहे की, उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचे पुढील भवितव्य काय असेल ? ते तहहयात भाजपची बी टीम बनून रहातील की, येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप पेक्षा मोठे किंग मेकर ठरतील. जे एकनाथ शिंदे यांना ओळखतात ते सहज सांगतील की, शिवसेनेतून 40 आमदार घेऊन फुटून निघताना आपण मुख्यमंत्री जरी झालो तरी ते औट घटकेचे मुख्यमंत्री असणार हे काय एकनाथ शिंदे यांना माहीत नसेल काय ? किंवा भाजपच्या सरकार मध्ये इतकी वर्ष असल्याने भाजप नेमकी कशी चालते , काय करते याची कल्पना नसेल का ? तर नक्की आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर एकनाथ शिंदे यांनी मिळालेल्या संधीचा फायदा स्वताचा राजकीय आणि सामाजिक पाया कसा विस्तारीत करता येईल याकडे लक्ष पुरवले, ज्या पद्धतीने संघटना बांधली , जे निर्णय घेतले आणि ज्या पद्धतीने वाटचाल केली त्यातून त्यांनी काही ठळक गोष्टी केल्या
पहिली म्हणजे आपल्या सोबत असणाऱ्या आमदार, खासदार, नेते, जिल्हा प्रमुख यांच्या सोबत वीण घट्ट केली. हे करत असताना त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा उपयोग आपली मराठा म्हणून असणारी प्रतिमा ठळक आणि घट्ट करण्यासाठी तर केलाच शिवाय तमाम मराठा नेते आणि संघटना मध्ये ‘मैं हू ना’ हा ठळक संदेश पाठवला. मराठा आंदोलन आणि त्याची ताकद ठळक करण्यासाठी अख्खे मंत्रिमंडळ मराठा आंदोलनाच्या ठिकाणी पाठवले. इतकेच नाही तर आपली संघटनात्मक ताकत देखील आंदोलनाच्या मागे लावली. त्यामुळे शरद पवार आणि छत्रपतीच्या मखरात बसलेल्या मराठा नेत्यांच्या पेक्षा आपल्या सारखाच संवेधनशील नेता एकनाथ शिंदे आहेत हा विश्वास एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजात पक्का केला. त्यानंतर समाजात जो अपप्रचार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी चालवला होता त्याला त्यांच्यातले उरलेले आमदार, जिल्हा प्रमुख, नेते फोडत त्यांचा दावा किती फोल आहे हे सिद्ध करत राहिले आणि आज एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा कितीतरी मोठे नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरस्थावर झाले आहेत. कुठल्याही पक्षाला त्यांना ओलांडून किंवा गृहीत धरून पुढे जाता येणार नाही
त्यानंतर त्यांनी प्रशासनातील अशी पदे शोधली की, ज्यांना न्याय दिला की, सर्व ग्रामीण आणि शहरी भागात त्यांच्या नावाची चर्चा होईल. त्यानुसार त्यांनी ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या फायद्याचे निर्णय घेऊन आपल्या त्यांनी आपण काम करणारा नेता आहोत हा संदेश दिला, मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, बस मध्ये महिलांना अर्धे तिकीट, मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्या माध्यमातून लाखो रुग्णांना थेट दिलासा, कोल्हापूर मधील महापूर, इर्शाल वाडीतील नैसर्गिक आपत्ती यात दाखवलेली संवेदनशीलता यातून लोकांनी आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नेते असल्याचे स्वीकारले आहे.
यासर्व प्रकारात तुम्ही एक गोष्टीकडे लक्ष दिले तर मराठा – बहुजन नेतृत्वाचा पट आता जवळपास रिकामा आहे. मराठा संघटना, ओबीसी संघटना आणि अनेक दलित संघटना त्यातील कार्यकर्ते आपल्या नेतृत्वाला अवकाश आणि पंख देणाऱ्याच्या शोधत आहेत आणि त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात बहुजन – मराठा राजकारणाचा पासवर्ड जर कोण असेल तर तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना आहे. आता पर्यन्त मराठा आणि बहुजन समाजाचे नेतृत्व हे ग्रामीण परिसरातून आलेले आपण बघतो होतो मग ते यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील किंवा शरद पवार असतील आता प्रथमच अर्बन आणि रूरल म्हणजे शहरी आणि गावाकडील लोकांच्या सोबत समान रूपाने नाळ जोडणारा नेता कोण असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील राजकारणातील प्रमुख केंद्र म्हणून पुढे येईल. त्यांच्या मुळे महाराष्ट्रातील मराठा राजकारणाला पुन्हा ऊर्जा आणि नवी दिशा मिळण्याचे संकेत दिसू लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे हे भाजपची गरज म्हणून पुढे येतील, त्यांना सोडून जर ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या कडे गेले तर, भाजप आपली पत आणि विश्वासार्हता गमाऊन बसेल. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी ती मराठा राजकारणाचा चेहरा होऊ शकत नाही हे इतिहासात सिद्ध झाले आहे, भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून किसनराव वाऱ्खिंडे यांना देवून पाहिल मात्र त्याचा फार फायदा भाजपला झाला नाही. भाजपचा जो चेहरा आहे त्यासाठी अडचणीचा आहे आणि मराठा समाजात फडणवीस यांच्या बद्दल साजरे मत नाही आहे. त्यामुळे सध्यातरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे महाराष्ट्राचे हे मैदान उपजाऊ आणि अनुकूल आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात “मराठा आणि बहुजन राजकारणाचा पासवर्ड म्हणून “ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे येण्याच्या तैयारीत आहे आणि जी खेळी भाजपने उद्धव ठाकरे यांच्या सोबत खेळली ती खेळी ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत खेळू शकणार नाही. विधानसभा निवडूनकीत महाराष्ट्राने शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
किरण सोनावणे
