पवार राज्यसभेवर तर,ठाकरे विधानपरिषदेवर
सिध्देश शिगवण
मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्याच्या राजकारणातील दोन बढे नेते पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार राज्यसभेतून तर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. दोन्ही पक्षांकडून या दोन दिग्गज नेत्यांना पुन्हा अनुक्रमे राज्यसभा आणि विधानपरिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ हा १३ मे २०२६ ला संपणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील ९ आमदारांचा कार्यकाळ हा लवकरच संपणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होईल. या निवडणुकीत संख्याबळानुसार महाविकास आघाडी ९ पैकी एकच उमेदवार निवडूण आणू शकते.
दरम्यान, विधान परिषदेवर जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मविआला एकमेकांना मदत करावी लागेल, अशी सुचक भूमिका संजय राऊत यांनी मांडली. याचाच अर्थ राज्यसभेत शरद पवारांना निवडूण आणायचे तर विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंना आणायचे अशी मोर्चेबांधणी सरु आहे. दरम्यान याबाबत क्राँग्रेसची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही.

