भिडले, नडले आणि मग हरले..
नेपाळ अवघ्या ४ धावांनी इंग्लंडविरुध्द पराभूत
स्वाती घोसाळकर
मुंबई – अरबी समुद्रांच्या उसळणाऱ्या उंच लाटांपेक्षाही उत्तुंग उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या नेपाळच्या पाठीराख्यांच्या समोर नेपाळ बलाढ्य इंग्रजांना भिडले… फुलटू नडले आणि मग अवघ्या ४ धावांनी हरले… टी२० वर्ल्डकपमधिल पदार्पणातील मॅच ते भलेही हरले पण स्टेडियमवर उपस्थित नेपाळी प्रेक्षकांसह जगभरातील क्रिकेट शौकीनांची मने मात्र ते जिंकले.
दोन वेळा विश्वविजेते ठरलेला इंग्लंडचा संघ टी-२० विश्वचषकातील गट क मधील पहिल्याच सामन्यात नेपाळविरुद्ध शेवटच्या ओव्हरपर्यंत गॅसवर होता.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १८४ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात नेपाळ ६ बाद १८० धावा करत इतिहास घडवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. स्पर्धेतील बलाढ्य संघांपैकी एक असलेल्या इंग्लंडला पराभवाच्या उंबरठ्यावर नेपाळने आणले होते. वानखेडेवर सामना बघत असताना प्रत्येक नेपाळवासीयांची भावना ही अगदी १९८३च्या विश्वचषकाच्या वेळी जशी भारतीयांची होती अगदी तशीच होती. शेवटच्या दोन षटकांत तर नेपाळचा संघ बाजी मारतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
लोकेश बाम (२० चेंडूंत नाबाद ३९) याने नेपाळच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र शेवटच्या षटकात त्याला विजय मिळवता आला नाही. शेवटच्या षटकात नेपाळला विजयासाठी १० धावांची गरज होती. मात्र त्या ओव्हरमध्ये एकही चौकार किंवा षटकार न मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सॅम करनने अचूक यॉर्कर टाकत केवळ पाच धावा दिल्या. तरीही वानखेडे स्टेडियमवर १७ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावत नेपाळचा प्रेरणादायी खेळ अनुभवला. यातील बहुतांश प्रेक्षक हे नेपाळचे होते. नेपाळने आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कामगिरी करून दाखवली.
कर्णधार रोहित पौडेल (३९), दिपेंद्रसिंग ऐरी (३९), कुशल भुर्तेल (२९) आणि लोकेश बाम यांनी झुंजार लढत दिली. लोकेशने उशिरा आक्रमक फलंदाजी करत चार चौकार आणि दोन षटकार ठोकले, मात्र संघाला विजयरेषेपलीकडे नेता आले नाही.
संघ अडचणीत असताना लोकेशने जोफ्रा आर्चरच्या १८व्या षटकात दोन षटकार, तर ल्यूक वुडच्या १९ व्या षटकात सलग दोन चौकार मारत नेपाळच्या आशा कायम ठेवल्या. त्या वेळी शेवटच्या तीन षटकांत ४६ धावांची गरज होती. भुर्तेलने डावाच्या सुरुवातीला आक्रमक खेळ दाखवला, तर तिसऱ्या गड्यासाठी पौडेल आणि ऐरी यांच्यात ८२ धावांची भक्कम भागीदारी झाली. आसिफ शेख (७) लवकर बाद झाल्यानंतर भुर्तेलने १७ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह २९ धावा करत डावाला गती दिली. मात्र सहाव्या षटकात विल जॅक्सकडे सोपा झेल देत तो बाद झाला.
१४व्या षटकात कर्णधार पौडेलने अनुभवी गोलंदाज राशिद खानवर आक्रमण करत एक चेंडू थेट प्रेक्षकांत षटकारासाठी पाठवला, तर पुढील चेंडूवर अप्रतिम कव्हर ड्राइव्ह करत चौकार मारला. त्यानंतर त्याने ‘सामन्यातील सर्वोत्तम फटका’ मानला जाणारा परफेक्ट स्विच-हिट खेळत चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेपलीकडे पाठवला.
मात्र ड्रिंक्स ब्रेकमुळे पौडेल आणि ऐरी यांची लय खंडित झाली. १५व्या षटकात ऐरी सॅम करनचा चेंडू नीट खेळू शकला नाही आणि बाद झाला. त्यानंतर काही वेळातच पौडेलही लियाम डॉसनच्या गोलंदाजीवर फिल सॉल्टकडे डीप मिडविकेटला झेल देत माघारी परतला. त्याने खेळलेली ही खेळी नेपाळच्या आशा उंचावणारी ठरली होती. अखेर इंग्लंडने मोठ्या संकटातून सावरत नेपाळवर चार धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, इंग्लंडकडून जेकब बेथेल (५५) आणि कर्णधार हॅरी ब्रूक (५३) यांनी आक्रमक अर्धशतके झळकावत संघाला ७ बाद १८४ धावांपर्यंत पोहोचवले. टी-२० विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या डावखुऱ्या बेथेलने ३५ चेंडूंमध्ये चार षटकार आणि चार चौकारांसह झपाट्याने अर्धशतक पूर्ण केले. तर ब्रूकने स्वतःभोवती निर्माण झालेली नकारात्मक चर्चा बदलण्याच्या प्रयत्नात उपयुक्त खेळी केली. ब्रूक ३२ चेंडूंमध्ये चार षटकार आणि तीन चौकारांसह ५३ धावा करून बाद झाला. चौथ्या गड्यासाठी त्याने बेथेलसोबत ७१ धावांची भागीदारी केली. नेपाळच्या गोलंदाजांनी मात्र कडवी झुंज दिली.
शेर मल्लाने आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्ट (१) याला बाद करत आनंद साजरा केला. नंदन यादवने जोस बटलर (२६) याचा मोलाचा बळी घेतला. पाचव्या षटकात यादवने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर बटलरला यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. सातव्या षटकात फिरकीपटू संदीप लामिछानेने रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात टॉम बँटनला पायचीत बाद केले. यानंतर बेथेल आणि ब्रूक यांनी इंग्लंडचा डाव सावरला. बेथेलने आपल्या पहिल्या चार चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक षटकार मारला होता.
नेपाळने गोलंदाजी करताना फारशा फुकट धावा दिल्या नाहीत. मात्र वानखेडे स्टेडियमवरील सलग दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने शेवटच्या टप्प्यात बाजी मारली. इंग्लंडने अखेरच्या तीन षटकांत ४५ धावा केल्या. विल जॅक्सने चार षटकार आणि एक चौकार ठोकत १८ चेंडूंमध्ये नाबाद ३९ धावा केल्या.
निळ्या रंगाच्या (लाल कडेसह) जर्सी परिधान केलेले नेपाळी चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये उपस्थित होते. प्रत्येक डॉट बॉल आणि चांगल्या खेळावर ते जोरदार जल्लोष करत होते. इंग्लंडच्या चाहत्यांपेक्षा नेपाळी चाहत्यांची संख्या अधिक होती, त्यामुळे हिमालयीन देशातील क्रिकेट प्रेम अधोरेखित झाले. नेपाळच्या खेळाडूंनीही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. नेपाळच्या क्षेत्ररक्षकांनी झेल अचूक पकडले. दिपेंद्रसिंग ऐरी (२/२३) आणि नंदन यादव (२/२५) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. शेर मल्ला आणि संदीप लामिछाने विकेट घेत महत्वाची भूमिका बजावली होती.
