मराठीतून विज्ञान प्रसाराचा उपक्रम
‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन
सिद्धेश शिगवण
ठाणे :मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि मराठा मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हेमंत साने लिखित व लोकवाङ्मय गृह प्रकाशित ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी मराठा मंडळ हॉल, पाचपाखाडी, ठाणे (प.) येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला ‘जिज्ञासा’ संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, ज्येष्ठ विज्ञान प्रसारक व लेखिका डॉ. मानसी राज्याध्यक्ष आणि मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा मंडळ, ठाणेचे अध्यक्ष सुरेश सुर्वे व सरचिटणीस राजेंद्र साळवी यांचीही उपस्थिती राहणार आहे.
‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकात ११८ मूलद्रव्यांची माहिती मराठीत देण्यात आली असून विविध वैज्ञानिक व अभियांत्रिकी संकल्पना सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या आहेत. अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक असल्याचे आयोजकांनी नमूद केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विज्ञानप्रेमी नागरिकांनी या मराठीतून विज्ञान प्रसाराच्या उपक्रमाला उपस्थित राहून पाठबळ द्यावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे अध्यक्ष व ज्येष्ठ खगोल अभ्यासक सोमण यांनी केले आहे.
