योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात
कल्याण: उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई, वाढते तापमान आणि त्यामुळे पक्षी व इतर व जीवसृष्टीसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, योगदान फाउंडेशन ट्रस्टतर्फे माझा रूपया निसर्गासाठी’ या लोकसहभाग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त एक रुपया योगदान देऊन निसर्ग संवर्धनासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात निसर्ग संरक्षणासाठी मोठ्या देणग्यांपेक्षा सामूहिक सहभाग अधिक प्रभावी ठरतो या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकासाठी सहज शक्य असलेले एक रुपये योगदान हे या मोहिमेचे वैशिष्ट्य असून, कोणताही आर्थिक बोजा न पडता प्रत्येक नागरिकाला निसर्गासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत जमा होणाऱ्या योगदानातून पक्ष्यांसाठी पाणपोई उभारणे, वृक्षरोपण करणे, पक्ष्यांसाठी प्राथमिक उपचार केंद्र सुरू करणे, तसेच निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याअभावी होणारे पक्ष्यांचे हाल कमी करण्यावर या मोहिमेचा भर राहणार आहे.
योगदान फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष मदनमोहन चव्हाण यांनी सांगितले की, “₹1 ही केवळ रक्कम नसून निसर्गासाठी दिलेला सहभाग आहे. मोठ्या योगदानाची अपेक्षा न ठेवता, सामान्य माणसालाच या चळवळीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.” या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन ही केवळ संस्था किंवा शासनाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी या लोकसहभाग उपक्रमात सहभागी होऊन *‘माझा ₹1 निसर्गासाठी’* या संकल्पनेला पाठबळ द्यावे, असे आवाहन योगदान फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
