उल्हासनगरात लेटलतिफांना
आयुक्तांचा शिस्तीचा दणका
उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेत लोकनियुक्त सरकार स्थापन होताच सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पालिका मुख्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. उशिराने आलेल्या प्रवाशांना थेट पालिका मुख्यालयातच प्रवेश नाकारण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पहिल्याच दिवशी तारांबळ उडाली. अखेर या कर्मचाऱ्यांची नोंद करत त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
कर्मचारी पालिका मुख्यालयात निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने येत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात कामकाजाचा आढावा घेणे, भेटी देणे अशी कामे रखडत होती. याबाबत महापौर अश्विनी निकम यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अखेर याची गंभीर दखल घेत उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सोमवारी सकाळी अचानक कडक कारवाई केली. सकाळी उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांना पालिका मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.
थेट आय़ुक्तांनीच प्रवेश नाकारा असे आदेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पालिका मुख्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी उभे राहणे पसंत केले.
