महिलांच्या चेहऱ्यावरील अॅसिड हल्ले केवळ अत्याचारच नाहीत तर अतिशय क्रूर मानवी वृत्तीचे प्रतीक म्हणून निंदनीय देखील आहेत परंतु केवळ महिलाच नव्हे तर आजकाल काही पुरुषही ‘फेशियल’ या सौन्दर्यासाठीच्या नावाखाली चेहऱ्यावर अॅसिड लावीत असतात. मात्र हे अॅसिड घातक नसून काही प्रमाणात त्वचेचे संरक्षण आणि पोषण करणारे असते असे आधुनिक विज्ञान म्हणते.
भारतीय संस्कृतीत यासाठी हळद या नैसर्गिक वस्तूचा उपयोग शतकानुशतके सुरु आहे. कारण हळदीत उत्तम असे वैद्यकीय गुणधर्म असतात. त्वचेच्या आरोग्यासाठी हळदीसोबतच चंदन. आवळा, कोरफड आणि केशर यांचा पूर्वी वापर केला जात असे. आयुर्वेदात असे अनेक वेगवेगळे प्रकार आणि त्वचेवरील लेप सांगितले गेले आहेत ज्यांना आधुनिक काळात आणि विज्ञानात ‘केमिकल पील’ अर्थात ‘सेंद्रीय सौंदर्य साधन’ असेही म्हटले जाते. आजच्या जीवनात आपल्याकडे अतिशय तीव्र अशी रासायनिक आम्ले असतात आणि त्यांच्या तीव्रतेमुळे आणि अपघात होण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्याबद्दल मनात ‘केमोफोबिया’ या नावाने ओळखली जाणारी एक भीतीही असते. आयुर्देद नैसर्गिक घटक आणि प्राचीन परंपरा यांच्यावर आधारित असल्यामुळे त्यांच्या उपयोगाने कोणतेही नुकसान होत नाही अशी खात्री असू शकते परंतु आधुनिक सौदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये त्यांची अपार गुणवत्ताच सांगितली जाणे नवीन नाही.
आधुनिक विज्ञानानेही त्वचेच्या संगोपनासाठी काही सेंद्रीय आम्लांची निर्मिती केली असून ती त्वचेवर आणि चेहऱ्यावर लावली जाऊ शकतात. अशी जी सात आम्ले उपयोगात आणली जातात त्यापैकी ग्लायकॉलिक, लॅक्टिक आणि सॅलिसिलिक ही महत्वाची आहेत. यामुळे त्वचेच्या पेशींचा अतिशय पातळ असा पापुद्रा काढून टाकला जाता आणि त्वचा नितळ होते. घरच्याघरी करण्यासारख्या अशा साधनातून साधारणपणे विपरीत परिणाम होत नसले तरी आपली त्वचा विशिष्ट सौंदर्यसाधनासाठी योग्य आहे का याची तपासणी करावी अशी सौंदर्यप्रसाधन तज्ञ मिशेल वॉंग यांची सूचना आहे.
त्या म्हणतात, “ज्याना नेहमी त्वचेचे विकार असतात त्यांना काहीतरी तीव्र उपचार करून घ्यावेत असे वाटणे चुकीचे नसले तरी यात सांगितली जाणारी शब्दावली क्लिष्ट असते. सौंदर्य हे वेदनादायक असले तरीही…प्रक्रिया पूर्णपणे समजावून घेतल्याशिवाय यात लक्ष घालू नये.” चेहऱ्यावरीलच कशाला आपल्या शरीराच्या तव्चेवरील मळ आणि पेशींचा अतिशय पातळ पापुद्रा काढून टाकण्यासाठी आपण साबण आणि इतर बरेच काही वापरीत असतोच. या अगोदर सांगितलेल्या ग्लायकॉलिक, लॅक्टिक आणि सॅलिसिलिक आम्लांना ‘हायड्रॉक्सी आम्ल’ असे नाव आहे आणि आज यांचा वापर बाजारातील ६५ टक्के सौंदर्यप्रसाधन उत्पादनात होतो आणि यावरील संशोधनातून निर्माण काही प्रजाती आता मान्य होत आहेत.
याशिवाय आधुकिक प्रसाधनात कोरड्या त्वचेसाठी पॉलीसकराइड वर्गातील हायलुरॉनिक आम्ल, त्वचेचे जीवनसत्व मानले जाणारे रेटिनॉइक आम्ल, लॅक्टोबायॉनिक आम्ल अथवा ग्लुकॉनोलॅक्टोन आम्ल वाढत्या वयातील त्वचेच्या समस्यांसाठी उपयुक्त असते आणि अस्कॉर्बिक आम्ल हे देखील त्वचेला जीवनसत्व पुरवणारे असते.
त्वचा रूक्ष असेल तर तिची आर्द्रता वाढवण्यासाठीही काही सौंदर्य प्रसाधने असतात आणि तीही आता लोकप्रिय होत आहेत. सौंदर्य प्रसाधन केंद्रांमधून कोणतीही प्रक्रिया करून घेताना संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे आहे. हे सांगावे लागतेच. प्रसाधनातील घटक आपल्या त्वचेला योग्य असायलाच हवेत त्याला पर्याय ठेवू नयेत हे उत्तम…
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स
