जोडीदाराची विवेकी निवड – एकदिवसीय संवाद शाळा संपन्न
अनिल ठाणेकर
मुंबई- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा घाटकोपर यांच्यावतीने, जोडीदाराची विवेकी निवड – एकदिवसीय संवादशाळा हा एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. हा उपक्रम लग्नाळू मुला-मुलींसाठी वाटत असला तरी तो फक्त लग्नाळू व्यक्तिंसाठीच नसून लग्न या विषयाशी संबंधित असणाऱ्या आणि आताच्या काळातील लग्नाविषयीचे बदलते आयाम हे समजू न शकणाऱ्या वयोगट १६ ते पुढील सर्व वयोगटासाठी हा संवाद होता. या कार्यक्रमासाठी घाटकोपर शाखेचे कार्याध्यक्ष शहाजी पाटोदेकर, प्रधान सचिव प्रफुल्ल रणदिवे, संदेश खळे, कैलास बद्रीके, निर्मला माने, संदेश बालगुडे, प्रियांका सवाखंडे, अनंत जोशी, अरुण सातव, छाया धनवे आणि इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती.
“जोडीदाराची विवेकी निवड” हा नात्यातील सहजीवन आणि सहजीवनातील सुरेल संवाद याविषयी केवळ हे व्याख्यान न घेता गेम, व्हिडिओ आणि, केस स्टडी मधून आपण काय आव्हाने, चुकीच्या समजुती टाळू शकलो असतो/शकतो, आवश्यक, अनावश्यक गोष्टी यावरील तो संवाद यातून हा उपक्रम उलगडत जातो. गेली दहा वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून जन्म झालेला हा उपक्रम तरुणाईला भुरळ पाडतोच पण लग्न संस्थेची संबंधित असलेल्या, सद्य काळात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा जाणीवपूर्वक अभ्यास करता सगळ्यांना विचार करायला आणि तसं वर्तन करायला भाग पाडतो. “विवेकी जोडीदार निवड की जोडीदाराची विवेकी निवड” यातील शब्दाची जागा बदलली की वाक्याचा अर्थ वेगळा निघतो नेमका कोणता दृष्टीकोन बाळगावा आपण हे प्रत्येकाने आपल्या समज, स्व आणि कुटुंब समाज ओळखनुसार ठरवावे.या विषयावरील एक दिवसीय संवाद शाळा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा घाटकोपर यांच्यावतीने शिवाजी टेक्निकल स्कूल, पंतनगर, घाटकोपर येथे पूर्ण दिवसभर घेण्यात आली होती. यासाठी मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वयोगटातील लग्नाळू, लग्न झालेले जोडपी, पालक असे सर्वच प्रकारातील ६० लोक इथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संवादक म्हणून आरती नाईक, महेंद्र नाईक आणि रुपेश शोभा शंकर यांनी काम पाहिले.
चौकट
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव विजय परब, मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश सूर्यवंशी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ सुषमा बसवंत, घाटकोपर शाखेचे अध्यक्ष केतन शहा आणि विविध ठिकाणावरून लोकं पूर्वनोंदणी करून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित लोकांनी कार्यक्रम आवडल्याचे आणि या कार्यक्रमाची ठिकठिकाणी गरज असल्याचे तसेच प्रत्येकाने आपल्या परिवार आणि नातेवाईक यांच्याशी अशा प्रकारचा संवाद घडवून आणला पाहिजे असे सांगितले. या प्रकारे पूर्ण दिवसभर कार्यक्रमाचे शानदारपणे नियोजन करण्यात आले.
