ठाणे महापालिका आयोजित पर्यावरणपूरक प्रशिक्षणास महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे : महिला सक्षमीकरणासोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी कचरा व्यवस्थापन तसेच सूक्ष्म हिरव्या भाज्यांची लागवड या विषयांवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शहरी उपजीविका केंद्र, तत्वज्ञान विद्यापीठ येथे करण्यात आले.
ठाणे महानगरपालिका गेल्या दहा वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्था (NGO) व महिला बचत गटांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य प्रभावीपणे राबवत आहे. समाज विकास विभागामार्फत बचत गटांना अधिकृत मान्यता देण्यात येते. त्यांना ओळखपत्रे, घंटागाड्या, वर्गीकरण शेड आदी सुविधा पुरवण्यात येतात. या माध्यमातून कचरा वेचक महिलांना घराघरातून कचरा संकलन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व प्रशिक्षण देण्यासारख्या विविध रोजगार संधी उपलब्ध होत असल्याचे उपपर्यावरण अधिकारी वैशाली पालकर यांनी नमूद केले.
उपक्रमात परिसर विकास भगिनी संस्था, स्त्री मुक्ती संघटना, अँटी प्लास्टिक ब्रिगेड, समर्थ भारत व्यासपीठ आदी संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. भविष्यात वृक्षलागवड व संगोपन, कापडी पिशव्या तयार करणे यांसारखी अन्य पर्यावरणपूरक कामेही महिला बचत गटांमार्फत करता येतील, असेही त्यांनी नमूद केले.यानंतर स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर यांनी आपल्या प्रभावी व सोप्या शब्दांत तसेच गीतांच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. कुटुंब व समाजाच्या विकासासाठी महिलांनी अर्थार्जन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगत महिलांना प्रेरित केले.कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करत ओला व सुका कचरा वर्गीकरणाची आवश्यकता व त्याची योग्य पद्धत उपस्थित महिलांना परिसर भगिनी विकास मंडळाच्या कल्पना अंधारे यांनी समजावून सांगितली. तसेच परिसर भगिनी विकास मंडळाच्या निर्मला सावंत यांनी कडधान्ये, तृणधान्ये व गळीत धान्यांपासून सूक्ष्म हिरव्या भाज्यांची लागवड कशी करावी, याची सविस्तर माहिती दिली. भाज्या घरच्या घरी तयार करून कुटुंबाला रक्तक्षय (अॅनिमिया) पासून वाचवता येते, असे त्यांनी सांगितले. शिवाय, या लागवडीच्या माध्यमातून महिला बचत गटांना सहजपणे उत्पन्नाचे साधन निर्माण करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
