तिसगांव पाडा, विजयनगर प्रभागातील प्रलंबीत रस्तामुळे नागरीक त्रस्त
काम त्वरीत मार्गी लावण्यासाठी नगरसेवक महेश गायकवाड यांनी अधिकाराऱ्यांना धरले धारेवर
कल्याण : कल्याण पूर्वेतील विजय नगर प्रभागातील सम्राट अशोक विद्यालय ते तिसगांव पाडा आणि पुढे १०० फुटी रोड पर्यंत जाणारा मंजूर डी पी रस्त्याचे काम रखडले असल्याने या परिसरातील रहिवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची शिवसेना नगसेवक महेश गायकवाड यांनी सोमवारी संबंधीत अधिकारी आणि बाधीत स्थानिक रहिवाशी यांच्या सोबत पहाणी केली आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावून रहिवाश्यांची त्रासा पासुन मुक्तता करावी अशी सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिली असून या बाबतची पूर्तता नजिकच्या काळात न झाल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा त्यांनी गर्भीत इशारा दिला आहे.
पुणे लिंक रोड पासुन, सम्राट अशोक विद्यालया समोरून तिसगांव पाडा ते पुढे १०० फुटी रोड पर्यंतचा ९ मिटर रुंदीचा रस्ता सम्राट अशोक शाळेपासून काही अंतरावरच स्थानिक जमिन मालकाने अडवून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पुढे सरकत नसल्याने आहे त्या रस्त्यावर नागरीकांना विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक महेश गायकवाड यांनी अधिकारी व स्थानिक रहिवाश्यांसह प्रत्यक्ष जागेची पहाणी केली. यावेळी महेश गायकवाड यांनी या गंभीर समस्येची दखल घेत हा रस्ता लवकरात लवकर आवश्यक त्या बाबी पुर्ण करून पुर्ण करण्यात यावा अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांना दिला आहे. या वेळी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन यमगर यांनी दिले आहे.
