महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला
पुण्यात खो-खो परिवारातर्फे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर
पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके लोकनेते व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपल्याची भावना प्रत्येक मैदानातून व्यक्त होत असून, खो-खो परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या शोकसभेत ही हानी शब्दातीत असल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले.
भावपूर्ण शोकसभा : आठवणींनी दाटलेले क्षण
पुण्यात पार पडलेल्या या विशेष शोकसभेत राज्यभरातून आलेले क्रीडा संघटक, प्रशिक्षक, पंच, खेळाडू व पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
खेळाडूंचे कैवारी, शिस्तप्रिय नेतृत्व
मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी दादांची खेळाप्रती असलेली ओढ, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि निर्णयक्षमता अधोरेखित केली. “दादा शब्दाला जागणारे होते; एकदा शब्द दिला की काम पूर्ण,” असा अनुभव अनेकांनी सांगितला. खो-खो खेळाला आधुनिक स्वरूप देत त्याला व्यावसायिक उंचीवर नेण्यात दादांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद झाले.
निधी, सुविधा आणि थेट संवाद
राज्यातील क्रीडा संकुले, मैदाने, स्पर्धा व खेळाडूंसाठी निधी उपलब्ध करून देताना दादांनी कधीही आखडता हात घेतला नाही. सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रायगड आदी जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी अडचणीच्या काळात दादांनी मोठ्या भावाप्रमाणे मदतीचा हात दिल्याच्या आठवणी सांगितल्या. मैदानावर थेट येऊन खेळाडूंशी संवाद साधण्याची त्यांची शैली सर्वांच्या मनात कोरली गेली.
महिला खेळाडूंना बळ
महिला खेळाडूंना संधी, सन्मान आणि नेतृत्वाच्या पातळीवर पुढे आणण्यात दादांचे योगदान मोलाचे असल्याचे रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नमूद केले. “महिलांना विश्वासाने पुढे नेणारा नेता आज आपल्यात नाही,” ही भावना सर्वत्र उमटली.
न भरून निघणारी हानी
“दादा केवळ अध्यक्ष नव्हते, तर प्रत्येक खेळाडूचे पालक होते,” असे ज्येष्ठ प्रशिक्षकांनी सांगितले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाचा खंदा आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली.
संकल्प : अपूर्ण स्वप्नांची पूर्तता
महाराष्ट्राचा खेळाडू जागतिक स्तरावर चमकावा, ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक पदके मिळावीत आणि खो-खोला जागतिक व्यासपीठ मिळावे, हे दादांचे स्वप्न होते. या स्वप्नांची पूर्तता करण्याचा संकल्प शोकसभेत व्यक्त करण्यात आला. दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, माजी सरचिटणीस प्रा. जे. पी. शेळके, अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीरंग इनामदार, सतीश देसाई, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्राचे खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, श्रीरंग गोडबोले, राजेंद्र बलकवडे, प्रशांत पाटणकर, बाळासाहेब तोरसकर, विजय जाहेर, जयांशु पोळ, शैलजा पटवर्धन, किरण वाघ, सचिन चव्हाण, रफिक शेख, उमेश शिंदे, उमेश आटवणे, श्रीकांत ढेपे, प्रविता माने, डॉ. प्रशांत इनामदार आदी मान्यवरांनी शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणावर उपस्थिती होती व प्रत्येकाची भावना वरील प्रमाणेच होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *