सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व…!

उबाठा सेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ?
महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणारे ७ अपक्ष विजयी.
राजन चव्हाण
सिंधुदुर्ग : तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात महायुतीने बाजी मारली असून ५० पैकी ४० जागा जिंकून जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे.जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उबाठा सेनेला मात्र अवघ्या तीन जागा मिळाल्या असून या निकालामुळे या पक्षाच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या निवडणुकीत महायुतीमध्ये खास करून भाजपामध्ये सावंतवाडी,वेंगुर्ले,दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊन सात ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे ठाकले होते आणि आश्चर्य म्हणजे हे सातही बंडखोर विजयी झाले आहेत.                   खरं तर नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुका महायुतीतील  तिन्ही घटक पक्षांनी एकत्रितपणे लढवाव्यात यासाठी पुढाकार घेतला होता.मात्र भाजपमधील राणे विरोधी गटाने या युतीमध्ये मोडता घातला आणि त्याचा शेवट मैत्रीपूर्ण लढतीत झाला.मालवण, कणकवली आणि सावंतवाडीत तर भाजपा आणि शिंदे सेनेत जोरदार संघर्ष झाला.आणि त्याचा जबर फटका भाजपाला बसला.हा धडा घेत भाजपाच्या नेतृत्वाने पुढाकार घेत या निवडणुकीत महायुती करण्याची जबाबदारी नारायण राणे यांच्यावर सोपवली. त्यानुसार महायुतीतील घटक पक्षांना एकत्र करून जागा वाटपाचा ‘ फॉर्म्युला ‘ निश्चित करण्यात आला.मात्र उमेदवार निवडीच्या वेळी भाजपांतर्गत, खास करून राणे समर्थक व मूळचे भाजपाचे यांच्यात वाद उफाळून आला.साहजिकच प्रत्यक्ष अर्ज दाखल होताना भाजपाला बंडखोरीला तोंड द्यावे लागले. कांही ठिकाणी ती शमवण्यात नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यशस्वी झाले. मात्र तरीही बंडखोरी झालीच.या बंडखोरी मागे राणेविरोधी कोणीतरी ‘अदृष्य शक्ती ‘आहे यावर महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागली.ही ‘अदृश्य शक्ती’ जिल्ह्यातील आहे की जिल्ह्याबाहेरील यावरही चर्चा रंगली.या ‘अदृष्य शक्ती’ने महायुतीचे, खास करून राणे समर्थक आणि शिवसेनेचे उमेदवार पडण्यासाठी बंडखोर,अपक्षांना आणि ‘ उबाठा ‘ सेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला,त्यांना अनेक बाबतीत रसद पुरवली असे आरोप केले जात होते. आजही ते होतं आहेत.आजच्या निकालाने या आरोपांना एक प्रकारे पुष्टी मिळाली आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
या ‘अदृष्य शक्ती ‘च्या कारवायांचा फटका शिंदे सेनेचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांना चांगलाच बसला आहे.मात्र कुडाळ – मालवणचे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यावर मात करत आपल्या मतदारसंघात मुसंडी मारत ५ जागांवर कब्जा मिळवला आहे.भाजपाला २ जागा मिळाल्या तर उबाठाला जेमतेम १ जागा मिळाली.कुडाळ तालुक्यातील ‘ नेरूर ‘ मतदारसंघात निलेश राणे यांचे खंदे समर्थक संजय पडते यांचा शिंदे सेनेच्याच रुपेश पावसकर यांनी बंडखोरी करत विजय संपादन केला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघातील देवगड, वैभववाडी,कणकवली या तिन्ही तालुक्यात घवघवीत यश मिळवत आपला ‘ करिष्मा ‘ कायम राखला आहे.
‘राणे ब्रँड ‘म्हणजे विकास…!
दरम्यान आजच्या या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना,नितेश राणे म्हणाले, १९९० पासून नारायण राणे यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला.’राणे ब्रँड ‘ म्हणजेच सिंधुदुर्गचा विकास ही सऱ्या देशात ,जगात सिंधुदुर्गची ओळख आहे.

जि. प. एकूण 50 जागा
महायुती -40
भाजपा – 26
शिंदे सेना -14
उबाठा सेना -3
अपक्ष – 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *