अजित पवारांचा घातच झाला ?

० रोहीत पवारांनी केले अपघाताचे पोस्टमार्टेम

० अजित पवारांना विमानाने जाण्यासाठी भाग पाडणारे ते दोन नेते कोण ?

० दादा गेले काही दिवस प्लास्टिक एवेजी काचेच्या बाटलीतून पाणी का पित होते ? दादांना घातपाताचा संशय आला होता का ?

० शेवटच्या क्षणी पायलट का बदलले गेले ?

० इस्त्रालयच्या मोसाद असे अपघात घडवण्यात तरबेज

० पायलट आत्मघाती मिशनवर होता का ?

स्वाती घोसाळकर

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच होता असा संशय यायला पुरेसा वाव असलेली स्फोटक माहिती त्यांचे पुतणे आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.

अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येताना विमान अपघातात निधन झाले होते. या घटनेच्या १३ दिवसानंतर आज रोहित पवारांनी आज अनेक पुरावेच मीडियासमोर सादर केले. दरम्यान अजित पवारांचे काका आणि रोहीत पवारांचे आजोबा शरद पवारांनी मात्र अपघात झाल्यानंतर लगोलग हा घात नव्हे तर अपघातच होता अशी जाहिर प्रतिक्रीया दिली होती. त्याबाबत आज रोहीत पवारांना छेडले असता शरद पवार साहेबांनी अपघातानंतर सहा तासाने ती प्रतिक्रीया दिली होती, मी १३ दिवसानंतर अभ्यासाने बोलत आहे. अनेक तथ्य मला या दिवसात सापडली. शरद पवारांना अजून मी हे प्रेझेंटेशन दिलेले नाही. पण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.

रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न या अपघातावर उपस्थित केले आहेत. अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन ऐनवेळी बदलला की कुणाकडून जाणीवपुर्वक बदलवला गेला का ? हे पाहावं लागेल असं रोहित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा खूप काळजी घ्यायचे, त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणीही प्यायचं बंद केलं होतं अशी खळबळजनक माहिती रोहित पवारांनी दिली. त्याचसोबत विमान प्रवास किंवा हेलिकॉप्टर प्रवास करताना खात्रीच्या व्यक्तीचे हेलिकॉप्टर वापर असा सल्ला दादांनी आपल्याला दिल्याची आठवण रोहित पवारांनी सांगितली.

इस्त्रायलची मोसाद ही गुप्तचर संघटनेकडे अशाप्रकारचे अपघात करण्याची क्षमता असल्याचे रोहीत पवार म्हणाले.

विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे आधीच काही गोष्टी समजल्या नाहीत. विमान अत्यंत खालच्या अंतरावरून उडत होतं, मग  तिथे EGPWS इशारा दिला होता की नाही? त्याचा अलर्टचा आवाज का आला नाही? असे काही प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.

याची उत्तरे मिळायलाच हवी…

१.अजितदादा बारामतीला कारने जाणार होते. पण एका नेत्याच्या सांगण्यावरून फाईलवर सही करण्यासाठी दादा थांबले. त्याला उशीर झाला. तसेच त्यांच्या पक्षाचा एक नेता त्यांना भेटण्यासाठी उशीरा आला. उशीर झाल्यामुळे दादांनी विमानाने जायचं ठरवलं. अजितदादांचा प्लॅन कुणी बदलवला का?

२. दादा ज्या विमानातून जाणार होते त्या विमानाचा पायलट आणि को पायलट, दोघेही ऐनवेळी का बदलवण्यात आले?

३. दादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही?

४. विमान खाली येताना एका बाजूला कलल्याचं दिसलं, त्यामागे कारण काय?

५. विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे?

६.  विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठे आहे?

७. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण भारतात यावर काहीच कारवाई का करण्यात आली नाही?

८. या आधी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघाताचा रिपोर्ट दाबण्यात आला आहे का?

९. सुमीत कपूर या पायलटवर दारू प्यायल्यामुळे तीन वर्षे बंदी आणली होती अशी माहिती आहे. मग अशा पायलटला व्हीआयपी लोकांच्या विमानाचा पायलट का बनवलं?

दादांची जागा कुणीच घेऊ

शकत नाही – सुनेत्रा पवार

मुंबई : दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन, अशी प्रतिक्रीया सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आज मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर दिली.

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. पण त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *