कुंभमेळ्यासाठी नाशिक होणार प्रकाशमान!
सिन्नरच्या बंद वीज प्रकल्पातून पुन्हा सुरू होणार वीज निर्मिती
हरिभाऊ लाखे
नाशिक – सिन्नर येथील खासगी औष्णिक वीज प्रकल्प सर्वाधिक बोली लावून ताब्यात घेतल्यानंतर महाजनकोने आता २७० मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेची दोन संयंत्रे पुन्हा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून सुरुवातीला ५२० मेगावॉट इतकी वीज निर्मिती होईल. सिंहस्थ कुंभमेळ्यात विजेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ही वीज निर्मिती महत्वाची ठरणार आहे.
सि्न्नर तालुक्यातील हा औष्णिक वीज प्रकल्प पूर्वी बहुचर्चित इंडिया बुल्स कंपनीचा होता. विभाजनानंतर तो रतन इंडिया पॉवर कंपनीकडे गेला. १३५० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाल्यानंतर थकबाकी न भरल्यामुळे दिवाळखोरीत निघाला. लिलाव प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारच्या मालकीची वीज निर्मिती कंपनी महाजनको आणि सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (एनटीपीसी) यांनी एकत्रितपणे ३८०० रुपयांची सर्वाधिक बोली लावली.
फेब्रुवारी अखेरपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पावर पूर्णत: नियंत्रण मिळणार आहे. या माध्यमातून रतन पॉवरच्या प्रकल्पाचा हिश्याचा भाग आणि ‘नॉन प्रोसेसिंग क्षेत्र’ ताब्यात येईल. या भागातील उर्वरित मोकळ्या जागेशी महाजनकोचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले जाते. आता महाजनकोने बंद पडलेला औष्णिक वीज प्रकल्प नव्याने सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सिन्नर येथील हा प्रकल्प १३५० मेगावॉट क्षमतेचा आहे.
पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २७० मेगावॉटचे दोन संयंत्र (युनिट) सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम पुढील सहा ते आठ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महाजनकोचे संचालक (प्रकल्प) अतुल सोनजे यांनी सांगितले. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकला वीज पुरवठ्याचा एक शाश्वत स्त्रोत उपलब्ध करून देणे हे महाजनकोचे मुख्य उद्दिष्ट आहे. एक मार्चपासून सिन्नर येथील प्रकल्पावर कर्मचारी नियुक्ती आणि इतर प्राथमिक कामांना वेगाने सुरुवात होणार असल्याचे सोनजे यांनी नमूद केले.
तूर्तास रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक
सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी कोळसा वाहतुकीसाठी एकलहरे ते सिन्नर असा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी महाजनकोने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जोपर्यंत रेल्वे मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत एकलहरे येथील प्रकल्पात कोळसा उतरवला जाईल.आणि तेथून रस्ते मार्गाने तो सिन्नरला नेला जाणार आहे. प्रारंभी कार्यान्वित केल्या जाणाऱ्या दोन संयंत्रांसाठी दररोज आठ हजार टन कोळसा लागणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रेल्वे मार्गातील काही क्षेत्राचे भूसंपादन होणे बाकी आहे. रेल्वेमार्ग कार्यान्वित झाल्यानंतर सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे सुलभ होणार असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *