फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरुणांना वेध लागतात ते वेगवेगळे डेज साजरे करण्याचे. त्यासाठी ते जय्यत तयारीही करतात. रोझ डे पासून सुरू झालेला डेजचा हा महोत्सव व्हॅलेंटाईन डे ला संपतो. या दरम्यान प्रपोज डे, टेडी डे, प्रॉमिस डे , चॉकलेट डे, टेडी डे, हग डे, किस डे असे विविध प्रकाराचे डे येतात. डेजचा हा माहोत्सव आठवडाभर चालतो. तरुण वर्ग विशेषतः महाविद्यालयीन तरुण हे डेज साजरे करण्यात आघाडीवर असतात कारण याच वयात मनी प्रेम फुलत असते. आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून गुलाबाकडे पाहिले जाते म्हणून या दिवसात गुलाबाच्या फुलाला खूप मागणी असते. यावेळी तरुणांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. या डेजच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होत असते हे जरी खरे असले तरी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी व्हॅलेन्टाईन डेजचाच मुहूर्त का लागतो ? आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी नजरेचा एक कटाक्ष आणि चेहऱ्यावरील स्मितहास्यही पुरेसे असते. त्यासाठी व्हॅलेन्टाईन डेजचाच मुहूर्त असावा असे काही नाही. मुळात असे डेज साजरे करावेत की नाही यावर देखील मतमतांतरे आहेत. माझ्यामते आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी, आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू वस्तू देण्यासाठी, त्यांना आनंदी करण्यासाठी, त्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी, त्यांना आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी कोणत्याही डेची गरज नसते. बरे हे डेज पुराण तरुणांसाठीच असतात असेही नाही. आजच्या सोशल मीडियाच्या युगात डेजचे पेवच फुटले आहे. व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, फादर्स डे, मदर्स डे, ब्रदर डे, सिस्टर डे, डॉक्टर्स डे, वकील डे, इंजिनियर्स डे असे कितीतरी डे येतात. एका वर्षात किती डे येतात आणि जातात याची गणनाच नाही. अती झाले नि हसू आले अशी गत या डेजची झाली आहे. सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह राहणाऱ्यांसाठी तर हे डेज म्हणजे पर्वणीच असते. वेगवेगळ्या डेजच्या शुभेच्छा देणाऱ्यांच्या पोस्टवर लाईक, कमेंट आणि शेअरचा पाऊस पडत असतो. वर्षभर कधी आई वडिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त न करणारे मदर्स डे, फादर्स डे ला खूप एक्टिव असतात. जन्मदात्या आई वडिलांसाठी, त्यांच्या आठवणींसाठी, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मदर्स डे, फादर्स डेची वाट पाहण्याची वेळ तरुणांवर आली आहे. हे डेज म्हणजे नैतिकतेचे अवमुल्यन आहे. कोणतेही डे साजरे करण्यापूर्वी खरोखरच या डेजची आवश्यकता आहे का ? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्यांचे अंधानुकरण केल्यामुळे आपल्या मूळ संस्कृतीशी आणि मूल्यांशी दुरावा निर्माण होत आहे, हे मात्र नक्की!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

श्याम ठाणेदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *