ममता परदेशी यांचा ऐतिहासिक सायकलिंग जागतिक विक्रम
कल्याण : आदी कैलास व ओम पर्वत या अतिदुर्गम आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या स्थळांपर्यंत पहिली महिला सोलो सेल्फ सपोर्ट सायकल मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण करून डोंबिवलीच्या ममता परदेशी यांनी ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ही मोहिम २३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडली.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डकडून या विक्रमाची अधिकृत नोंद करण्यात आली. त्यानिमित्ताने डोंबिवली येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित सुसंस्कार क्लासेसच्या कार्यक्रमात ममता परदेशी यांना सन्मानित करण्यात आले. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे सीईओ दिनेश गुप्ता यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सायकलिंग मोहिमेत ममता परदेशी यांनी अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती, उंच पर्वतीय मार्ग, बदलते हवामान आणि दीर्घ अंतरांचा सामना करत ही कामगिरी यशस्वी केली. त्यांच्या या विक्रमामुळे महिला सायकलिंग, साहसी क्रीडा तसेच प्रेरणादायी सामाजिक उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास सुसंस्कार क्लासेसचे पदाधिकारी, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सायकलिंगप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
