मुलाच्या लग्नाला यायचं हं !
नवी दिल्ली : भारत रत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनी सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि त्याची होणारी पत्नी सानिया चांढोक यांच्या लग्नाचे औपचारिक निमंत्रण दिले.
या भेटीचे छायाचित्र सचिन तेंडुलकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या भेटीदरम्यान अर्जुन तेंडुलकर, भावी पत्नी सायना चंडोक, सचिन यांची कन्या सारा तेंडुलकर तसेच पत्नी अंजली तेंडुलकर उपस्थित होत्या.
दरम्यान, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांढोक यांच्या विवाहसोहळ्यांना ३ मार्च २०२६ पासून सुरुवात होणार असून, ५ मार्च २०२६ रोजी मुख्य विवाहविधी पार पडणार आहे. याआधी ऑगस्ट २०२५ मध्ये अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा झाला होता.
अर्जुन तेंडुलकर हा सध्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंटसकडून खेळत आहे. लखनऊने मुंबई इंडियन्सकडून त्याला घेतले आहे. पुढील हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना अर्जुनवर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वाचे लक्ष राहणार आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुनने मुंबईकडून सुरुवात केल्यानंतर तो गोवा संघासाठी महत्त्वाचा गोलंदाज-अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. उंचकाठी डावखुरा वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीत उपयुक्त फलंदाज असलेल्या अर्जुनने २०२२ मध्ये गोव्याकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करताना शतक झळकावले होते. विशेष म्हणजे, वडील सचिन तेंडुलकर यांनी जसा पहिल्याच प्रथमश्रेणी सामन्यात शतकाचा पराक्रम केला होता, त्याचाच पुनरावृत्ती अर्जुनने केली होती. तर सानिया चांढोक ही यशस्वी उद्योजिका असून, ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात आहे.
