राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता गांधी विचार व संविधान स्विकारायला हवे – सुरेशचंद्र राजहंस
आरएसएसला सलमान खान, अदनान सामींसह सिने तारे तारकांची गरज का भासावी?
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षे पूर्ण करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर वंदन केले ही संघाला लागलेली उपरती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना संघ शरण गेलाच आहे तर आता गांधी विचार मान्य करायला हवा आणि देशाच्या संविधानाचाही स्विकार करावा, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
संघाच्या शतकपूर्ती कार्यक्रमा संदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, मुंबईतील संघाच्या कार्यक्रमात सिनेमाविश्वातील तारे तारकांना बोलावण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गरज का भासावी हा प्रश्न आहे. यात सलमान खान, अदानान सामी यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. एरवी हिंदु मुस्लीम, हिरवा रंग, औरंग्यांची औलाद म्हणून मुस्लीम समाजाचा अपमान करायचा, समाजात द्वेष पसरवायचा आणि आपल्या कार्यक्रमाला मात्र मुस्लीम समाजातील लोकप्रिय व श्रीमंत लोकांना बोलावायचे हा दुटप्पीपणा आहे. तारे तारकांना बोलवण्यात काहीच गैर नाही पण हिंदु मुस्लीम करून गरिबांवर बुलडोझर चालवायचा, दडपशाही करायची आणि लोकप्रिय व श्रीमंत मुस्लीमांना जवळ करायचे आणि मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप मात्र काँग्रेस पक्षावर करायचा हे ढोंग व सोंग आता थांबायला हवे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईच्या कार्यक्रमात केलेली विधाने व वस्तुस्थिती यांच्यातही मोठी तफावत आहे. संघप्रमुख कोणत्याही समाजाचा होऊ शकतो असे ते म्हणतात तर मग आजपर्यंत एकही महिला, दलित, आदिवासी, मुस्लीम समाजाचा व्यक्ती सरसंघचालक का झाला नाही, याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे. संघाच्या करनी व कथनीत फरक आहे. सरसंघचालक जे बोलतात त्याचे प्रतिबिंब संघाच्या कार्यातून व भाजपाच्या राजकारणातूही दिसत नाही, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *