‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ विषयावर जळजळीत लेखन स्पर्धा
कल्याण : सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक विचारप्रवर्तक आणि जळजळीत लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ हा स्पर्धेचा विषय आहे.
या स्पर्धेमध्ये साहित्यिक या संकल्पनेचा सखोल विचार मांडण्याची अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. साहित्यिक कुणाला म्हणावे, त्याची नेमकी व्याख्या काय, केवळ पुस्तक प्रकाशित झाले म्हणजेच कोणी साहित्यिक ठरतो का, साहित्यिक ठरवण्याचा अधिकार कुणी दिला, पुरस्कार मिळणे हे साहित्यिक असल्याचे प्रमाणपत्र आहे का, एखाद्या साहित्य संस्थेचा सदस्य असणे किंवा सदस्यत्व मिळणे हे साहित्यिकत्वाचे निकष ठरू शकतात का, अशा विविध प्रश्नांचा ऊहापोह लेखामध्ये व्हावा, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. तसेच वाचकांना गृहीत धरण्याची मानसिकता कधी थांबणार आणि वाचकच नसतील तर लेखनाचा उपयोग काय, या मुद्द्यांवरही स्पर्धकांनी आपले परखड मत मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या लेखन स्पर्धेसाठी ५०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली असून स्पर्धकांनी आपला लेख PDF स्वरूपात swamirajprakashan@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. लेख पाठविण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या लेखांचे परीक्षण तीन मान्यवर वाचकांकडून करण्यात येणार असून निवडक तीन लेखांना रोख रकमेची आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २७ मार्च रोजी होणाऱ्या ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ या कार्यक्रमात पार पडणार आहे.
लेखनातून साहित्यिकत्वाची संकल्पना पुन्हा एकदा नव्याने तपासण्याची आणि चर्चेला चालना देण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार असल्याने नवोदित तसेच अनुभवी लेखकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
