हिरवी सावर जातीचे बहूउपयोगी झाड तोडल्याप्रकरणी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार
कल्याण : डोंबिवली मिलापनगर परिसर हा विविध वृक्षराजीने बहरला आहे. यामुळे या परिसरात आल्यावर एक प्रकारचा पर्यावरणीय आनंद सर्वाना मिळतो. सद्या या परिसरात गटारे नाले, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यांची कामे चालू आहेत. त्यामुळे काही झाडांना इजा होऊन ती पडतात किंवा सुकून मरून जात आहेत.
काही रहिवाशांना आता ही मोठी झालेली काही झाडे नकोशी झाली आहेत. त्यापासून विविध अडचणी आल्याने त्यांना ही झाडे पूर्णपणे तोडून हवी आहेत. त्यासाठी कायदेशीर मार्गाने न जाता झाड तोडणाऱ्यांना कंत्राट देऊन झाडे तोडली जात आहेत. असेच एक मिलापनगर RL-१३० आणि RL-१३१भूखंड मधील रस्त्याचा कडेला असलेले “हिरवी सावर” जातीचे बहुउपयोगी मोठे झाड हे सोमवारी अचानक माणसे आणून तोडण्यात आले. त्यामुळे काही वृक्षप्रेमी हळहळले. मिलापनगर मधील एक वृक्षप्रेमी ज्येष्ठ नागरिक मुकुंद वैद्य यांनी हे झाड बेकायदेशीर तोडण्यास हरकत घेतली असता झाड तोडण्यास सांगणाऱ्या त्या रहिवाशाने त्यास विरोध केला.
मुकुंद वैद्य यानी या झाडाच्या फांदया छाटाव्यात व जर पूर्ण झाड तोडायचे असेल तर प्रशासनाकडून रीतसर परवानगी घ्या, असा सल्ला दिला. परंतु त्या रहिवाशाचा हट्टापायी हे “हिरवी सावर” जातीचे बहुउपयोगी झाड पूर्ण तोडले गेले. यामुळे व्यथित होऊन वृक्षप्रेमी मुकुंद वैद्य यानी फोटो सहित याची तक्रार केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे. त्या तक्रारीची प्रत त्यानी मिलाप नगर रेसी. वेलफेअर असोसिएशनला दिली आहे. या तक्रारीची दखल घेऊन केडीएमसी कडून यावर काय कार्यवाही होते का ते पाहावे लागेल.
