राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्युमुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. धडाडीचा, कार्यक्षम आणि शिस्तबद्ध नेता म्हणून लौकिक असलेले अजित पवार आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावू शकले असते. त्यांच्या अकाली मृत्युमुळे राज्याने एक उमदा राजकारणी आणि कठोर प्रशासक गमावला आहे. या लोकनेत्याला वाहिलेली श्रद्धांजली.

राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा हंगाम सुरू होत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली आणि राज्यातील राजकारण्यांसह जनतेलाही मोठा धक्का बसला. या निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यासाठी सर्व पक्ष सज्ज होत असताना, सकाळी लवकर उठून कामाला सुरूवात करण्याची ख्याती असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार ही ख्याती जपत बारामतीमध्ये पहिली प्रचारसभा घेण्यासाठी मुंबईहून विमानाने पहाटेच बारामतीला जायला निघाले. प्रचारसभेची वेळ सकाळी साडेनऊची होती. पण विमानाच्या ‌‘लँडग‌’मध्ये काही तरी तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि हे विमान बारामतीजवळच एका दरीत कोसळले. हे विमान 500 फूट उंचीवरून कोसळल्यामुळे कोणी वाचण्याची शक्यता फारच धूसर होती. त्यानुसार विमानात बसलेल्या अजित पवार यांच्यासह पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येईल, हा अपघात टाळता आला असता का, यावर ऊहापोह होईल, पण या अपघातात राज्याने एक उमदे नेतृत्व गमावले आहे, हे वास्तव बदलू शकणार नाही. अजित पवार यांना उभा महाराष्ट्र एक उमदे व्यक्तीमत्व, शिस्तबद्ध राजकारणी आणि झटून काम करणारा नेता म्हणून ओळखतो. काका शरद पवार यांच्या छत्रछायेत राजकारणाचे धडे गिरवताना त्यांनी पक्षात, प्रशासनात आणि राज्यातील जनतेच्या मनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. 1991 च्या विधानसभा निवणुकीमध्ये ते सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनतर आजपर्यंत सलग सात वेळा बारामतीकरांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अनेकदा भूषवले.
राज्याच्या राजकारणामध्ये गेली 25 वर्षे अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कर्तबगार मंत्री, कठोर प्रशासक म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी आर्थिक शिस्त अंगी बाणवली होती. महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा आवाका त्यांच्या लक्षात आला होता. त्या जोरावर त्यांनी राज्याच्या अर्थ मंत्रालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणामध्ये अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भारतीय जनता पक्षाशी युती केली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैचारिक वेगळेपण गमावले नाही. आपली निष्ठा शाहू-फुले-आंबेडकर यांच्याशी आहे हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले. निवडणुकांमध्ये जय-पराजय होत असतात, पण अजित पवार यांच्याकडे नेहमीच जनाधार होता. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगले यश मिळवले. या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मिळून (शरद पवार गट आणि अजित पवार गट) एकूण 21.5 टक्के मते मिळवली होती, ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. पुढे या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाल्यानंतर 20 ते 21 टक्के लोकांचा पाठबा असणारा हा पक्ष असणार होता. पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार होते. पण दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने या सर्व शक्यता कागदावरच राहिल्या.
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये विमान आणि इतर अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्या अनेक नेत्यांमध्ये अजित पवार यांचा समावेश झाला आहे. या नेत्यांच्या मृत्यूंमुळे राजकारणाची दिशा बदलल्याचे आपण पाहिले आहे. संजय गांधी, माधवराव शदे, आंध्र प्रदेशचे कर्तबगार माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे मृत्यू विमान अपघातांमध्येच झाले होते. तत्कालीन केंद्रिय कृषीमंत्री आणि महाराष्ट्रचे माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचा मृत्यू वाहन अपघातात झाला होता. या सर्वांच्या मृत्यूनंतर त्या त्या राज्याच्या कवा देशाच्या राजकारणात बदल झाल्याचे आपण पाहिले आहे. आता अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाची दिशाही बदलण्याची चिन्हे आहेत. अलिकडच्या काळात अजित पवार आणि शरद पवार यांची जवळीक वाढत होती. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची युती झाल्याचे आपण पाहिले. आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठीही हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. या निमित्ताने अजित पवार भारतीय जनता पक्षाशी असलेल्या युतीतून बाहेर पडून काकांबरोबर जाणार का, असा प्रश्न पुढे येत होता. अर्थात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची जवळीक वाढत असली तरी अजित पवार युतीतून बाहेर पडले असते, असे मला तरी वाटत नाही. युतीबरोबर राहूनही ते स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवणार होते आणि त्याच वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक राखणार होते.
अजित पवार यांची प्रशासनावर घट्ट पकड होती याची अनेक उदाहरणे दिली जातात. त्याचबरोबर एखाद्याला शब्द दिला की तो पूर्ण करण्यासाठी ते जातीने लक्ष घालून काम करून द्यायचे, याचेही अनेक किस्से सांगितले जातात. असाच एक किस्सा मला आठवतो. अजित पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये झाले होते. त्यामुळे त्यांचे कोल्हापूरवर आणि कॉलेजजवळ असलेल्या रंकाळा तलावावर विशेष प्रम होते. मागे एकदा रंकाळा तलावात केंजाळ नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ती पाहिल्यावर त्यांना वाईट वाटले आणि त्यानी संबंधितांना हा तलाव दोन दिवसांमध्ये स्वच्छ करून देतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी खरोखरच सर्व यंत्रणा कामाला लावून दोन दिवसांमध्ये तलाव स्वच्छ करून दिला. अजित पवार हे एक धडाडीचे नेते होते, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते सहज मिसळत होते. त्यांचा कोणताही अभिजनवादी दृष्टीकोन नव्हता. त्यामुळेच ते जनमानसात लोकप्रिय होते. यासंदर्भातील पवार कुटुंबाची परंपरा त्यांनी जपली होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना मिळून 21.5 टक्के मते खेचता आली होती. मग सत्तेत राहून स्वत:चे वेगळेपण कायम ठेऊन (शरद पवार यांच्या पक्षाशी जवळीक साधून) ही 21 टक्के मते आपल्याकडे कशी ठेवता येतील याचा विचार अजित पवार करत होते. पुढील काळात त्यांचे भारतीय जनता पक्षाशी वाद झाले असते तर ते युतीतून बाहेरही पडले असते. पण लगेच युतीतून बाहेर पडण्याचा त्यांचा विचार असेल, असे मला वाटत नाही. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली किमान राज्यात तरी भारतीय जनता पक्षापुढे आव्हान निर्माण करू शकेल असा पक्ष निर्माण होऊ शकला असता. आता दोन्ही राष्ट्रवादी पक्षांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार यांचे वय बरेच झाले आहे. अजूनही कार्यरत असले तरी आता ते पूर्वीप्रमाणे तडफेने काम करू शकत नाहीत, हे सत्य आहे. त्यातच अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पक्षही नेतृत्वहीन झाला आहे. राज्यातल्या या महत्त्वाच्या पक्षापुढे आता नवे, सक्षम नेतृत्व निर्माण करण्याचे आव्हान आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे आता कदाचित दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढील काळात सरकारमध्ये रहायचे की नाही याबाबत सुरु झालेली चर्चा. पण माझ्या मते हा पक्ष सरकारमध्ये राहील. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे अजित पवार यांच्या जागी योग्य नेतृत्व देऊ शकेल असा सर्वमान्य नेता शोधणे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व जाते की आणखी कोणाकडे, हे आता पहावे लागणार आहे.
नजिकच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठे राजकीय बदल होणार नसले तरी पुढील काळात नक्कीच मोठे बदल पहायला मिळू शकतात. पुढील काळात ‌‘पॉलिटिकल रिअलाईनमेंट्स‌’ होण्याची शक्यता असून महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि स्वत:चे अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यावी यावर त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये होणारे विचारमंथन आणि त्यातून निर्माण होणारे नवे आडाखे हे मुद्दे हळूहळू स्पष्ट होत जातील. अर्थात त्यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पक्षात आणि राज्याच्या राजकारणात एकूणच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढे काय घडामोडी घडतात यावर बरेचसे राजकीय विश्लेषक लक्ष ठेऊन आहेत.

अशोक चौसाळकर

(अद्वैत फीचर्स)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *