कै. उमेश शेणॉय स्मृतीप्रित्यर्थ पुरुष व महिला व्यावसायिक स्पर्धा-२०२६
अमर हिंद मंडळात ‘डायनॅमिक’ खो-खोचा महासंग्राम!
क्रीडांगणाला ‘अजितदादा पवार क्रीडा नगरी’ नाव
शुक्रवार पासून रंगणार खो-खो क्रीडा जल्लोष
मुंबईतील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच! अमर हिंद मंडळाच्या वतीने, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने, १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ डायनॅमिक प्रायोगिक व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. वेग, डावपेच, चपळाई आणि व्यावसायिक दर्जाचा थरार अनुभवण्यासाठी ही स्पर्धा क्रीडारसिकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.
‘अजित दादा पवार क्रीडा नगरी’चे नामकरण
या प्रतिष्ठित स्पर्धाकालावधीत अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणाला ‘अजित दादा पवार क्रीडा नगरी’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या नामकरणामुळे स्पर्धेला अधिक भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार असून, क्रीडा क्षेत्रात नव्या पर्वाची नोंद होणार आहे.
संध्याकाळी रंगणार सामने : व्यावसायिक संघांची दमदार हजेरी
सदर स्पर्धा संध्याकाळच्या सत्रात खेळविण्यात येणार असून, पुरुष गटात नामांकित व्यावसायिक संघांचा सहभाग आहे.
पुरुष गटातील सहभागी संघ — पश्चिम रेल्वे, रिझर्व बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस, गंधेकर इलेक्ट्रीकल्स, मुंबई महानगरपालिका, नेवल डॉक, दत्तकृपा ट्रॅव्हल्स, महावितरण, महाराष्ट्र पोस्ट, डी डी अॅडव्हर्टायझिंग, रचना नोटरी. या सर्व संघांमध्ये आघाडीचे खेळाडू उतरतील, त्यामुळे प्रत्येक सामना हा चुरशीचा आणि उत्कंठावर्धक ठरणार आहे.
महिला गटातही दमदार स्पर्धा
महिला गटातही ताकदवान संघांचा सहभाग असून, पश्चिम रेल्वे, मुंबई पोलीस आणि महावितरण हे संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. महिला खो-खोच्या वाढत्या व्यावसायिक दर्जाचे दर्शन या स्पर्धेतून घडणार आहे.
संपर्कासाठी आवाहन : आयोजकांची माहिती
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी निलेश सावंत (९८२१३३५७८४), रोहन चव्हाण (८७७९४९३३६४), मधुरा पेडणेकर (८८५०६५३९३८), उत्कर्षा शेणॉय-तळेकर (९९२०९७००५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अमर हिंद मंडळाच्या प्रमुख कार्यवाह सीमा कोल्हटकर यांनी केले आहे.
खो-खोचा उत्सव : परंपरा, व्यावसायिकता आणि नवा इतिहास
कै. उमेश शेणॉय यांच्या स्मृतीस अभिवादन करत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा म्हणजे परंपरा आणि आधुनिक व्यावसायिकतेचा संगम आहे. दादरच्या क्रीडाभूमीत रंगणारा हा ‘डायनॅमिक’ महासंग्राम मुंबईच्या खो-खो संस्कृतीला नवे बळ देत ऐतिहासिक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *