ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक
अनिल ठाणेकर
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात जिल्हा परिषद ठाणेने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले असून लवकरच विजेत्यांचा राज्यस्तरीय गौरव करण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ व्यवस्था, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन व GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या सात निकषांवर जिल्हा परिषद ठाणेने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. संकेतस्थळ अधिक आकर्षक, वापरकर्ता-अनुकूल व सुरक्षित करण्यात आले असून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सायबर सुरक्षा, अद्ययावत माहिती, प्रभावी शोध प्रणाली आणि तक्रार निवारण यंत्रणा यामुळे संकेतस्थळ अधिक नागरिकाभिमुख झाले आहे.
ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासनातील गती व पारदर्शकता वाढली आहे. ३०४ कर्मचारी शंभर टक्के ई-ऑफिस वापरत असून १४ हजारांहून अधिक ई-फाइल्स तयार करण्यात आल्या आहेत. फाइल निपटारा दर ९२ टक्क्यांहून अधिक तर ई-रिसिप्ट निपटारा दर ९६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ९९ टक्के तक्रारींचे कालमर्यादेत निराकरण करण्यात आले आहे.
रिअल-टाइम डॅशबोर्डमुळे कामकाजाचे सतत निरीक्षण शक्य झाले असून निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे २४x७ माहिती सेवा उपलब्ध आहे. AI आधारित उपक्रम, ब्लॉकचेन प्रणाली व GIS तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, सुरक्षित व परिणामकारक बनले आहे. या सर्व उपक्रमांमुळे जिल्हा परिषद ठाणेने आधुनिक, लोकाभिमुख व उत्तरदायी प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *