`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसप्रवासासाठी जाहीर केलेल्या डिजिटल ओळखपत्र योजनेतील अर्ज `महा ई सेवा’ केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.
महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व `टीएमटी’चे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांना पत्र पाठवून संजय वाघुले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज दाखल करताना होणाऱ्या अतोनात हालाकडे लक्ष वेधले. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची आग्रही मागणी केली आहे.
`टीएमटी’ बसमधून ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्यात येत आहेत. त्यासाठी ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर, वागळे आगार, वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस आणि धर्मवीर चौक  येथे अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ओळखपत्रासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्वत: उपस्थित राहण्याची अट आहे. त्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हामध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या ठाणे स्थानकातील केंद्रावर सर्वात जास्त गर्दी होत असून, एक ते दोन तास ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. त्यातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांनी `टीएमटी’चे डिजिटल ओळखपत्र काढण्याचे ठरविल्यास केंद्रांवर मोठी गर्दी होईल. सध्या या योजनेसाठी केवळ ऑफलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून परिवहन प्रशासनाने अर्ज स्विकारल्यास ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळू शकेल, याकडे लक्ष वेधून संजय वाघुले यांनी डिजिटल ओळखपत्र योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *