दादांच्या बारामतीत संशयाची भुते
थोरल्या पवारांचे थोरले बंधु आप्पासाहेब ऊर्फ दिनकरराव पवार हे कृषी तज्ज्ञ होते. त्यांचा मुलगा कृषी उद्योजक राजेंद्र यांचा आमदार पुत्र रोहीत पवार. हे नात्याने शरद पवारांचे नातू आहेत. अजितदादांचे वडील व पवार साहेब हेही भाऊ. त्यामुळे रोहित हा दादांचा पुतण्या. पवार कुटुंब राजकारणत निरनिराळ्या ठिकाणी असतानाही कुटुंब म्हणून नेहमची एकत्र राहिले. त्यांचे नाते घट्टच होते. पण २०२३ ते २०२५ या कालावधीत गणित बिघडले. कुटुंब दुभंगले. वितुष्ट आले. त्यात दादा रोहीत हे काका पुतणे दोन विरुद्ध बाजूंना उभे होते. राजकारणतही रोहीत व दादा हे अलिकडे एकमेकांच्या समोर शड्डू ठोकून होते. रोहित रा.काँ.श.प.चे बिनीचे आमदार तर दादा राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे मानाचे सरदार.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे दिग्गज उमेदवार राम शिंदे यांचा पराभव करून रोहित विधिमंडळात २०१९ ला आले. थोरल्या पवारांचे नातू म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा तेंव्हाही होता. झटून काम करण्याचे बाळकडू पवारांच्या घरातील सर्वच मुलांना मिळत असते. त्याप्रमाणे रोहित हेही एक मेहनती आमदार म्हणून पुढे येत होते. २०२३ च्या पुक्षफुटीनंतर रोहित आजोबा शरद पवारांना धरून राहिले. सत्तेत गेले नाहीत.
पण राष्ट्रवादी जेंव्हा अखंड अखंडित पक्ष होता, तेंव्हा भाजपा सोबत चला असा आग्रह करणाऱ्यात रोहित पवारांचेही नाव पुढे होते. बहुतेक सर्वच आमदार तत्कालीन प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत शरद पवारांकडे आग्रह करत होते की भाजपा आघाडीत जावूया. पण अंतिमतः जेंव्हा जून २०२३ मध्ये दादा चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले तेंव्हा रोहीत पवार हे त्यात नव्हते. अजितदादांचे कडवट टीकाकार अशीच रोहीत यांची प्रतिमा तेंव्हा राहिली.
२०२४ च्या लोकसभेसाठी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली तेंव्हा बारामतीतील पवार कुटुंबात उघड वाद सुरु झाले. अजितदादा तेंव्हा एकाकी पडले होते. त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार व त्यांचा पुत्र युगेंद्र हेही थोरल्या पवारांसबोत राहिले. युगेंद्र यांनी बारामतीत विधानसभेला अजितदादांच्या विरोधात शड्डू ठोकला होता.
सुनेत्रा पवार लोकसभेला पराभूत झाल्या नंतर अजितदादांना उपरती होऊ लागल्याचे दिसते. पवार कुटुंबातील सौहाद्र्य वाढत होते. डिसेंबर २०२५ – जानेवारी २०२६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां वेळी प्रथम अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाबरोबर आघाडी युती करण्यात पुढाकार घेतला. त्याच वेळी मुंबईत ठाकरे बंधूही ऐक्यासाठी टाळ्या देत होते. मागील दोन तीन वर्षात दुरावलेले पवार कुटुंब आणि मागील दोन दशके दुरावलले ठाकरे कुटुंब अशी महाराष्ट्राच्या राजकारणातली दोन महत्वाची घराणी, एकत्र येण्याच्या गोष्टी एकाच वेळी करू लागतात हे विशेष होते. “देवा”ची कृपाच की काय ?!
पवारांच्या बाबतीत या चर्चा जानेवारीच्या मध्यावर निर्णायक वळणावर पोचल्या होत्या असे आता, दादांच्या मृत्युनंतर, सांगितले जाते आहे. दादांच्या निधनानंतर दोन्ही पक्षांचे विलिनीकरण लगेच झाले असते, तर काय झाले असते ? हा प्रश्न सहाजिकच उभा राहतो. एकत्रित पक्षाचे निर्णयाचे अधिकार शरद पवारांकडेच गेले असते. आणि मग विधिमंडळात एकत्रित पक्षाचे नेतृत्व कोणी करयाचे व मंत्री उपमुख्यमंत्री कोणी व्हायचे हेही थोरल्या पवारांची ठरवले असते. कदाचित म्हणूनच दादांच्या नंतरच्या भावनिक नाजुक काळात महायुतीतील घटक पक्षाच्या शेंड्या शरद पवारांच्या हाती जाऊ नयेत अशी इच्छा भाजपा नेतृत्वाचीही असू शकेल.
दादांच्या सहकाऱ्यांनी अचानक घाई केली. दादांच्या जागी त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्राताईंची पदस्थापना करून घेतली. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या ऐक्याच्या चर्चा थंडावल्या.
गेल्या काही काळापासून, “दादा, दादा” करणारे रोहित पवार यांनी तर आता अशीही शंका व्यक्त केली की सुनेत्रा काकींना स्वतःच्या मना विरुद्ध कदाचित उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागलेली असावी. पुतण्याचा काकींच्या वागणुकी विशषषयीचा असा संशय म्हणजे जरा अतिच होतेय!
त्याहूनही पुढे जात, रोहीत पवारांनी अजितदादांच्या मृत्युमध्येच काळे बेरे होते, कट होता अशा शंका व्यक्त करयाला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या हवाई वाहतुक मंत्रालयाने बारामतीत २८ जानेवारीच्या सकाळी घडलेल्या विमान अपघाताची चौकशी सुरु केलेली आहे. राज्याचे सीआयडी पोलीसही स्वतंत्र चौकशी करत आहेत. राज्य सरकारच्या तातडीच्या विनंतीवरून केंद्रीय हवाई वाहतुक मंत्रालयाने हवाई वाहतुक महासंचालकांच्या (डीजी सिव्हील) अंतर्गत आणखी एक चौकशी सुरु केलेली आहे. इतके सुरु आहे तरी रोहित म्हणत आहेत की फ्रेंच वा अमेरिकन हवाई तज्ज्ञांना बोलावून चौकशी करा आमच्या शंकांचे निरसन करा. अ
जित दादांच्या अपघातानंतर काही तासातच संशयाची भुते उभी करायला काही मंडळींनी जाणीवपूर्वक सुरुवात केली होती. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींनी तसे विधान केले. विरोधी पक्षांच्या कथित इंडि आघाडीतील अन्य काहींनीही म्हटले की हा घातपात असणार. पण स्वतः शरद पवारांनी लगेचच जाहीर केले होते की हा पूर्णतः अपघात दिसतो आहे यात कुणीही राजकारण आणू नये. पण त्यांच्या पुतण्याचे पुत्र, आमदार रोहित मात्र नेमके तेच करताना दिसत आहेत.
२८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते पावणे नऊ दरम्यान काय काय घडले हे आता आपल्या सर्वांनाच माहिती झाले आहे. मुंबई विमानतळावरून अजित पवार हे सकाळी ८ वाजता निघाले. पायलट सुमित कपूर व को आयलट शांभवी पाठक हे त्या लिअर जेट विमानाचे सारथ्य करत होते. प्रवाशांना चहा पाणी देण्यासाठी पिंकी माळी होत्या. सतत दादांसोबत राहणारे पोलीस अधिकारी विदीप जाधव हेही होते. असे पाच मजेत निघाले होते. कोणताही अनुचित प्रकार विमानाबाबत घडला नव्हता.
हे विमान ८ वाजून ३९ मिनिटांनी बारामतील विमानतळा जवळ होते. पुढच्या दोन मिनिटात ते उतरले असते आणि दादा सुखरूपपणे बाहेर निघाले असते. पण त्या एका मिनिटातच घात झाला. बारामतीच्या धावपट्टीवर उतरत असताना विमान अचानक कलले व धावपट्टीबाहेर कोसळले. क्षणात मोठा स्फोटाचा आवाज व आगीचे लोळ दिसले आणि पुढच्या काही मिनिटातच विमानातली पाचही प्रवासी जळून ठार झाल्याचे निष्पन्न झाले.
सारे राज्य सारा देश शोकसागरात होता. पण अपघात घडला तेंव्हा जळपास राहणारे बारामतीतील काही लोकांचे बोलणे, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेली दृष्ये यांच्या प्रसारणातून काही शंका कुजबुजी व्यक्त होऊ लागल्या. दुसऱ्या दिवसापासून हा घातपातच कसा होता हे छातीठोकपणाने सांगणारे काही व्हीडिओ प्रसारित झाले.
कोणतीही मोठी दुर्घटना होते तेंव्हा लगेच शंका कुशंका व्यक्त करणारे, घातपाताची थिअरी मांडणारे लोक पुढे येतातच. त्यांना वाटत असते की सारेच कसे कट-कारस्थानातून चाललेले असते. पण त्यात साधा विचार, साधे तर्कशास्त्र काही ते वापरत नाहीत. बारामतीच्या भीषण विमान अपघातातही असेच काहीसे झाले आहे.
धावपट्टी चुकली होती, पायलट दारू व्यायला होता का, त्याने मे डे मेडे असा धोक्याचा संदेश का नाही दिला, विमानातून विना परवाना इंधनाचे ड्रम नेले जात होते, दादांना ते विमान पुरवणारी व्हीएसआर कंपनीच दोषी होती, इथपासून ते सुसाईड बाँबर होता, एक सहावी व्यक्ती विमनात होती, स्फोट होण्याच्या काही क्षण विमनातून एकजण बाहेर पडला व वाचला, ते दादाच असतील, ते लपले आहेत व लौकरच परत येतील असे वाटेल ते लोक बरळू लागले.
विमानाची देखभाल दुरुस्तीच केलेली नव्हती ऐनवेळी पायलट बदलण्यात का आला, आधीच्या पायलटने नकार दिला म्हणून ऐनवेळी दुसरा पायलट आणला, त्याने मुद्दाम अपघात घडवला असेल… अशाही शंका बोलून दाखवल्या गेल्या.
रोहित पवारांची पत्रकार परिषद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून याच साऱ्या शंकांची फेर मांडणी होती. त्याला काही कागदपत्रांचा आधार दाखवला गेला. काही व्हाटसअप चॅट रोहीत यांनी पैदा केले. त्यात व्हीएसआर कंपनीचे प्रमुख कॅप्टन विजय कुमार हे दादांच्या अपघातग्रतस्त विमनाच्या पायलटच्या दारुसेवना विषयी बोलत होते असे दाखवले आहे. हे चॅट खरे की खोटं हा पुढचा प्रश्न आहेच.
पण कोणी कितीही कट-कारस्थाने केली व करोडो रुपये खर्च करू म्हटले तरी अशा प्रकारे एखदा पायलट स्वतःहून विमान अपघातग्रस्त करू शकेल यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. त्यावरही रोहित पवारांकडे उत्तर आहे. इस्त्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेचा कारवायांवरील एका कथित पुस्तकाचा संदर्भ देऊन रोहित म्हणतात की तुम्हाला शत्रूला मारायचे असेल तर त्याच्या ड्रायव्हरला आधी फितवले की काम होते. याचा अर्थ दादांच्या विमनाच्या पायलटला कोणीतरी फितवले होते. असा कट रचून कोणाला काय मिळणार होते? कोणाचा फायदा होणार होता? रोहित यांनी स्पष्ट काही सांगितलेले नाही. पण विदर्भातील एक नेता, शेकडो कोटींचे कंत्राट दादांनी दिलेली कंपनी, काही मोठे नेते यांच्याकडे ते संशयाची सुई फिरवत आहेत. हेही भयंकरच आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *