शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे
दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ला सर्कल परिसरातील रस्त्यावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः भिवंडी–कल्याण महामार्गावरील दुर्गाडी पुलाच्या उतारालगतच हे खड्डे असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. हजारो वाहने ये-जा करणाऱ्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत असे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांचे जीव अक्षरशः धोक्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतच आणि शहराच्या प्रवेशद्वारावरच अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याचे लक्षात येताच या परिस्थितीची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांनी तात्काळ दखल घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. कोणताही विलंब न करता त्यांनी संबंधित विभागाला त्वरित सूचना देत युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश दिले.
जागरूक नागरिकांनी याबाबत परदेशी यांना सूचित करून वस्तूस्थितीकडे लक्ष वेधले होते. परदेशी यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत पुलाच्या उतारालगत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या भोवती असलेले सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यात आला आहे. वेळेत ही कारवाई झाली नसती, तर गंभीर अपघात अटळ होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
वेळेवर आणि संवेदनशीलपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळले असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले आहे.
