भाजपाप्रवेशानंतरही पनवेलच्या जे.एम.म्हात्रेना ईडीचा दणका
स्लग- एकुण ७० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
वनविभागाची जमीन चढ्याभावाने शासनाला विकून रग्गड पैसा जमवला
नवी मुंबई : पनवेलमधील प्रसिद्ध ठेकेदार जे एम म्हात्रे यांनी भाजपामध्ये प्रवेश करूनही त्यांना ईडीपासून सुटका मिळाली नाही. आजच्या १८ कोटींसह आतापर्यंत ईडीने जे.एम.म्हात्रेयांची एकुण ७० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
वनजमिनीचा अवैधरीत्या ताबा घेऊन ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करत मोबदला उकळल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने आज १८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, यामध्ये नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरातील तीन भूखंडांचा समावेश आहे.
जे एम म्हात्रे हे पनवेल मधील भाजपचे नेते असून त्यांचा मुलगा प्रितम म्हात्रे यांनी उरण विधानसभेतून शेतकरी कामगार पक्षाकडून आमदारकी लढवली होती. सध्या त्यांची सून पनवेल महानगरपालिकेत भाजपची नगरसेविका आहे.
सातबाऱ्यावर तसेच अधिकृत नोंदींमध्येही वनविभागाचे नाव असताना आरोपी जे एम म्हात्रे यांनी या नोंदींमध्ये फेरफार करून स्वतःचे नाव चढवले. शासनाचीच जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून या व्यवहारातून कोट्यावधी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.
ईडीच्या तपासात, या रकमेचा वापर करून म्हात्रे यांनी इतर मालमत्ता खरेदी केल्याचे तसेच काही कर्जांची परतफेड केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
हा मोबदला वनविभागाला देण्याबाबत वारंवार तगादा लावूनही आरोपींनी दुर्लक्ष केल्याने वनविभागाने या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२४ गुन्हा दाखल केला होता.
