मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे
अनिल ठाणेकर
मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्ज मुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
