म्हाडा फ्लॅट प्रकरणी आरोपीस कल्याण सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
कल्याण : म्हाडा अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याच्या प्रकरणात डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी दीपक विष्णू चव्हाण यास कल्याण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी. मुळे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. फिर्यादींच्या तक्रारीनुसार, सहआरोपीने म्हाडा अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन देत २०२० ते २०२४ या कालावधीत तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारली होती. मात्र आश्वासन पूर्ण न केल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने नमूद केले की, संबंधित गुन्हा सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेस पात्र असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा प्रकरणात अटक स्वयंचलितपणे करता येत नाही. आरोपीस बीएनएसएस २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती आणि त्याने तपासात सहकार्य केल्याचे सरकारी पक्षानेही नाकारले नाही. तसेच आरोपीचा कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसून त्याचा स्थिर निवास असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
तपास अटकेशिवाय होऊ शकतो, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. आरोपीतर्फे अ‍ॅड. सागर संजय तांबे, अ‍ॅड. जीवन म्हात्रे व अ‍ॅड. शिवराम गावडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *