अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ?

राजधानी दिल्लीतून रोहीत पवरांचे खळबळजनक आरोप

सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि माध्यम सल्लागर नरेश अरोरांवर संशय

अरोरांचे माध्यम सल्लागाराचे कंत्राट दादा रद्द करणार असल्याचा गौप्यस्फोट

अरोरांवरून तटकरे आणि दादांत मतभेद होते ?

अरोरांनी दोन विमाने विकत कशी घेतली ?

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर घातच होता असे मुंबईत जाहिर पणे पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत त्याहून खळबळ उडवून दिली.

अजित दादांच्या विमान अपघाताची चौकशी राष्ट्रीयस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडूनही करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी दिल्लीत केली. या अपघाताच्या पुर्वसंध्येला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माध्यम सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी असलेल्या शेकडो कोटींच्या करारावरूनही अजित पवार आणि सुनील तटकरें यात वाद झाल्याचा खळबळजनक दावा रोहीत पवार यांनी केला आहे. या शेकडो कोटींच्या कंत्राटावरुन वाद विवाद झाल्यानेच अजित पवार यांना उशीर झाला आणि म्हणून त्यांनी बारामतीला कार ने न जाता विमानाने जाण्याचा फैसला घेतला असा दावाही रोहित पवार यांनी केला. तसेच, बारामतीतही नरेश अरोरा यांच्या लोकांना दादांनी झापल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजित दादा जर गाडीने गेले असते तर दुर्देवी घटना घडली नसती. त्यामुळे, काय घडलं होतं त्या सर्व गोष्टी मी बोलून दाखवल्या आहेत. फाईल मुद्दामहून आणली गेली का? दादांनी फाईलवर सही केली, त्यानंतर ७ वाजून १३ मिनिटांनी दादांच्या विमानांचे बुकींग झाले. मी कोणावरही प्रश्न उपस्थित केले नाहीत, पण याचा तपास व्हावा, जे खरं आहे मी तिथे बोललो, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

अपघाताच्या पुर्वसंध्येला २७ जानेवारीला तटकरे म्हणताहेत की मी तिथे आलो उशीरपर्यंत थांबलो, त्यावेळी माध्यम सल्लागार नरेश अरोराच्या कराराची तिथे चर्चा झाली. दादाकडून त्या व्यक्तीचे शेकडो कोटीचे कंत्राट रद्द केले जाणार होते, त्यावरून वाद विवाद झाला म्हणून उशीर झाला, असा धक्कादायक गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला आहे. आम्ही पुण्यात बारामती हॅास्टेलला बसलो होतो, तेंव्हा नरेश अरोराच्या लोकांना दादांनी झापले होते. नरेश अरोराचं कंत्राट कायम ठेवून त्याला तेवढे पैसे द्यायला पाहीजे होते, असा काही नेत्यांचा आग्रह होता. कदाचित ते तटकरे असावेत असा अंदाज आहे, असे म्हणत रोहित पवारांनी नरेश अरोराच्या कंत्राटवरुन सुनिल तटकरेंकडे कंत्राटवरुन बोट दाखवले आहे.

सत्तेत नसतानाही अपघाताची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, मला वेळ मिळाली नाही. परंतु, ई-मेलच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार आहे. विरोधात असतानाही आम्ही लढतोय, पण जे सत्तेत आहेत ते बोलत नाही. संसद सुरू अससल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, विमान उड्डाणमंत्री यांनी वेळ दिला नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले. मोदी आणि अमित शाह यांना काकी भेटल्या, पार्थ जय होते. मी अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून जो काही अपघात झालाय तो घातपात होता की अपघात होता हाच मुद्दा मांडला असावा. तपास यासाठी व्हायला पाहिजे की ब्लॅक बॅाक्समध्ये काहीच मिळालं नाही. रेकॅार्डींग काहीच मिळालं नाही, अशी फालतू कारणं महाराष्ट्र ऐकणार नाही. अजित दादांचा घात झाला की अपघात झाला, याकडे नेत्यांचे लक्ष नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असेही रोहित पवार यांनी म्हटले. यात क्रिमिनल इन्वेस्टीगेशन व्हायला पाहीजे, पारदर्शक पद्धतीने तपास व्हायला पाहीजे. ब्लॅक बॅाक्स बंद करता येत नाही. पण, काहीजण म्हणत असतील की ब्लॅकबॅाक्स बंद आहे, तर मी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले असं होईल, असे म्हणत रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली. डीजीसीएनं तपास सुरू केला आहे, परंतु एका महिन्यांत इंटरनॅशनल एजन्सीद्वारे तपास व्हावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *