आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम व योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत राज्यात दरवर्षी विभागनिहाय बाल, युवा आणि महिलांसाठी स्वतंत्र साहित्य संमेलनांचे आयोजन चक्राकार पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक संमेलनासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने या सर्व संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे.
राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात मराठी भाषा धोरण जाहीर केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला. या धोरणानुसार ३६ जिल्ह्यांत साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बालक, महिला आणि तरुणांमध्ये मराठी भाषेबद्दल रुची आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने ही स्वतंत्र संमेलनांची संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमांमुळे मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरवर्षी १२ वर्षांखालील मुलांसाठी बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनांत मुलांच्या सक्रिय सहभागातून मराठी भाषेविषयी सहज आणि आनंददायी शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे. मराठीतील गमतीदार म्हणी, वाक्प्रचारांची ओळख, शब्दकोडी तसेच विविध कल्पक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संमेलनांची ठिकाणे मुलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक असतील, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच या संमेलनांत बाल मानसशास्त्रज्ञ आणि बाल साहित्यिकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे
