कबड्डीच्या विकासासाठी उत्तुंग भरारी घेतलेले शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांचे नाव भारत देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील अग्रक्रमाने नव्हे तर सर्वप्रथम घ्यावे लागेल असं त्यांचे व्यक्तिमत्व होतं.त्यांनी कबड्डीवर मनापासून प्रेम आणि जिद्द बाळगल्याने तिला उत्तुंग शिखरावर घेऊन जाणारं आणि धडपडणारे असं व्यक्तिमत्व प्राप्त झालेले होतं. ती त्यांची ख्याती विविध स्तरांवर उठून दिसत होती. सर्व सामन्यांना छोट्याश्या क्रीडांगणात खेळता येणारा हा खेळ असल्याने ग्रामीण, कामगार विभागात तसेच शैक्षणिक क्षेत्रात कबड्डीचा चाहता वर्ग आणि कबड्डीवर मनापासून प्रेम करणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात होता.
यापूर्वी हाच खेळ शारीरिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली म्हणजेच संलग्नतेखाली हुतूतू नावाने प्रत्यक्ष नऊ खेळाडू क्रीडांगणात खेळवून तो भारतीय,राज्य व जिल्हा स्तरावर खेळला जात असे. या खेळाबरोबर अन्य खो खो, कुस्ती,आट्यापाट्या व लंगडी आदी सारे खेळ देखील याच शारीरिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली खेळले जात होते. केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रासाठी “ वन गेम वन फेडरेशन “ ही भूमिका जाहीर केली. येथूनच बुवांनी आणि त्यांना साथ देणाऱ्या क्रीडा व शैक्षणिक संस्थांनी सर्वप्रथम खो खो व कबड्डी या दोन खेळांच्या विविध स्तरांवर स्वतंत्र क्रीडा संघटना स्थापन केल्या गेल्या. त्यानुसार सन १९५९ _१९६० साली आंध्र प्रदेश येथे खुल्या गटांच्या कबड्डी आणि खो खो च्या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. येथूनच बुवांनी राष्ट्रीय,राज्य आणि जिल्हा संघटनांच्या पदाधिकारी मंडळींची मोट बांधून त्यांना जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडून ती सहकाऱ्यांच्या सहकार्यातून संघटनात्मक रित्या यशस्वी केली. यामुळे तरुण, तरुणींमध्ये बुवा या नावाची नवी क्रेझ निर्माण झालेली होती. कबड्डी खेळाचा विकास करीत असताना त्याचा प्रचार प्रसार विविध जिल्हा व राज्य राज्यांतून करीत असताना युवा शक्ती सह राजकीय शक्ती कधीच कमी पडली नाही. पुढे विविध
राजकीय पक्षांनी देखील युवाशक्तीला आपलंस करण्यात पुढाकार घेतला असं म्हटले तर ते वावगे ठरणारं नाही. विविध जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील युवा आणि तरुणीचं संघटित वातावरण पाहून महाराष्टात सुरुवातीस यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील, शेकापची रायगड मधील पाटील मंडळी बुवांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.या माध्यमातून बुवांनी ग्रामीण जिल्ह्यांतून आणि राज्याराज्यांतून कबड्डी खेळाचा प्रचार प्रसाराची धुरा वाहण्यासाठी अनेक ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते देऊन कबड्डी खेळाचा पाया रचण्याचे काम करीत असताना त्यावर कळस चढवण्याचे काम देखील एकहाती बुवांनी केले.
बुवांकडे विचारांचा संकुचितपणा हा कधी नव्हता. सर्वांना मनाचा मोठेपणा दाखवण्यास भाग पाडत. याचा प्रत्यय मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करून घेताना त्यांच्या बोलण्यातून दिसून येत असे.सर्वप्रथम परळच्या युवक क्रीडा मंडळाची झालेली रौप्यमहोत्सवी अखिल भारतीय कबड्डी, खो खो क्रीडा स्पर्धा या भव्य दिव्य, डौलदार स्वरूपात आयोजित केल्या गेल्या होत्या.या नंतर स्पर्धांचे स्वरूप बुवा आयोजकांना बदलण्यास भाग पाडत. जागतिक स्तरांवर झेप घेण्यासाठी स्पर्धांचे स्वरूप हे भव्यदिव्य स्वरूपात झालेच पाहिजे असा त्यांच्या मनाचा कटाक्ष असे. क्रीडा नगरीत येणाऱ्या क्रीडा चाहत्यांना, क्रीडापटूंना व अधिकारी वर्गाना सोयी सवलतींच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास हक्काने भाग पाडत. स्पर्धेत कोणत्याच बाबतीत मागासलेपण ठेवायचे नाही. कोणत्याच बाबतीत संकुचितवृत्ती न बाळगल्याने त्यांनी देशात क्रीडा क्षेत्राचा विकास केला. हा त्यांचा आदर्श आज जगाच्या भूमीत जाऊन पोहचला.
दत्ताजी साळवी काय किंवा बुवा काय यांच्याकडे विचारांची स्पष्टता व आत्मविश्वास होता. असं असले तरीही यांना बुद्धिबळातील उंटाच्या तिरकस चाली प्रमाणे मनमुरादपणे बोलण्याची लकब होती. पोटात एक नि ओठात एक ही भानगड नव्हती. स्पष्टवक्तेपणा नव्हेच तर अगदी दिलखुलासपणा त्यांच्या अंगी ठाम होता. म्हणूनच दत्ताजी साळवी यांचा शिवसेनेची तोफ म्हणून दरारा होता. असं असलं तरी बुवांची वाणी म्हणजे त्याचं खरोखरच शक्तिस्थानच म्हणावे लागेल. त्यांच्या शब्दाला धार असे. बुवांकडे उपजतच वक्तृत्व शैली होती. ते उत्तम वक्ते असल्याने आपल्या वाणीने कार्यकर्त्यांची, लोकांची मने जिंकत.
बुवांकडे प्रशासकीय कौशल्य कमी होतं. शिवाय आर्थिक शिस्तीचं नियोजन नसताना व्यवस्थापनात आणि संघटनात्मक कार्यात नेहमीच शिखरावर गेलेले दिसले. प्रशासकीय कामकाज व आर्थिक कौशल्याची जबाबदारी नेहमीच तज्ज्ञांना देऊन ती जबाबदारी आपल्या
माध्यमातून यशस्वीपणे करून घेत. कबड्डी, खो खो आणि कुस्तीचे त्यावेळी असलेले अध्यक्ष शरद पवार बुवांबद्दल नेहमीच म्हणत, “ बुवांकडे कामाची अंमलबजावणी करण्याची दृष्टी होती. कामात प्रामाणिकपणा आणि मनापासूनचा सहभाग हा भाग असल्याने क्रीडा विकास होत गेला. क्रीडा संघटना आदी कामे उगाचच कोणावर सोपवून चालणार नाही त्याची वीण घट्ट बांधलेली असावी “ हे शरद पवारांना पक्के ठाऊक होते. ही शिकवण बुवांनी तंतोतंत पाळली. बुवांनी कार्यकर्त्यांना, संघटनांना आदींना संयम शिकवला. समतोलवृत्ती अंगी उतरवली आणि मुख्य म्हणजे उदिष्ट पक्के करून त्या उदिष्टाच्या पूर्तीसाठी जाताना भविष्याची दृष्टी देण्याची अनेकांना शिकवण दिली.
बुवांनी अर्थशास्त्रातील कोणतीही पदवी घेतलेली नव्हती किंवा त्यातलं काहीही कळत नसलं तरी देखील भव्य, दिव्य क्रीडा स्पर्धा कोणत्याही स्तरावरील असो त्याचे बजेट कसं कल्पकतेने उभे करायचं आणि ते शिल्लकित कसं राखायचे हे रहस्य बुवांना चांगलच माहीत असायचं. विविध स्तरांवरील क्रीडा स्पर्धेंच्या अर्थसंकल्पाची गणिते नेहमीच चुटकी सारखं सोडवणं ही बुवांची खास खासियत होती. कोणताही प्रकल्प तयार करून घेणे व त्याबाबतचे योग्य व्यवस्थित नियोजनाची तयारी करण्याची भट्टी बुवांना फार चांगल्या प्रकारे जमलेली होती.आपल्या राज्याबाहेर विकास आणि स्पर्धा आयोजित करीत असताना त्या यशस्वी करण्यासाठी बुवांची एक सोप्पी, साधी कार्यपद्धत होती. आयोजन समितीसाठी त्या क्रीडा संघटनांचे राष्ट्रीय, राज्य व जिल्हा संघटना पदाधिकारी. त्या त्या तालुका, जिल्हा, विभागानुसार तेथील शासकीय आणि स्थानिक नामवंत व राजकीय व्यक्तींना स्पर्धा संयोजन समितीची काही अपवाद पदे वगळता अन्य प्रमुख पदे देऊन स्पर्धेची आर्थिक बाजू विविध माध्यमातून त्यांना उचलण्यास भाग पाडत. असं त्यांना सामावून घेतल्याने परिघा बाहेरील क्रीडा विकास व आयोजन हे एक अतूट नातं तयार होतं. क्रीडा क्षेत्रातील मागासलेपण घालवण्यासाठी असा मार्ग योग्यच होता. म्हणूनच या समितीत क्रीडा संघटक, पुरस्कारर्थी क्रीडापटू , विविध क्षेत्रातील मंडळींना सहभाग करून घेत असताना महिला वर्गाला कधी विसरत नसत.
सन १०८० साली बुवांचे बंधू दत्ताजी साळवी यांचा वाढदिवस दादरच्या निवासस्थानी युवक क्रीडा मंडळाच्यावतीने साजरा केला. त्यावेळी बुवा नुकतेच मॉस्को (रशिया ) ऑलिंपिक स्पर्धेवरून परत आलेले होते. त्यावेळी दत्ताजीने बुवांबाबतचे मनोगत जाहीर केलेले होते.ते म्हणाले, “ हा तुमचा बुवा, कबड्डीचा ध्वज जागतिक स्तरांवर नक्कीच घेऊन जाईल याची मला खात्री आहे.पण त्यांच्या जीवाची तेवढी काळजी घ्या. बुवांचा आमच्या कुटुंबात सहभाग हा कमीच आहे.नियमित सारा दिवस घराबाहेरच असतो. मला खात्री आहे, पांडुरंगानी त्याला कबड्डीच्या उत्कर्षासाठी दूत म्हणून पाठविलेले असावे.हे दत्ताजींचे स्वप्न खरे झाले असेच आता म्हणावे लागेल!
बुवांनी कबड्डी, खो खो आणि अन्य देशी खेळांसाठी शासकीय स्तरावरून या खेळांना उंच शिखरावर नेण्याचे योगदान दिले. यामुळे या खेळांना आज सोनियाचे दिवस आलेले दिसत आहेत. मराठी तिथी नुसार महाशिव रात्रीच्या दिवशी बुवांनी या जगाचा निरोप घेतला. कबड्डीचा दम हा त्यांचा श्वास होता तो कधीही बंद होणारा नाही. साऱ्या जगात कबड्डीचा दम विविध स्तरांवरील क्रीडगणांत सतत घुमणार. तीच बुवांना वाहिलेली आदरांजली असेल!
लेखक हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक आहेत.
मनोहर आ.साळवी
