चार काळे कामगार कायदे लादून, श्रमिकवर्गाला उध्वस्त करण्याचा, केंद्र सरकारचा कुटील डाव – राजन राजे
अनिल ठाणेकर
ठाणे: अयोध्येत राम मंदिर बांधणारे; पण, कामगार-चळवळीला स्मशानभूमी दाखवणारे मोदी-शहा सरकार हे, श्रमिकांच्या विरोधात असून, कामगारांच्या जीवावर आणि त्यांच्या रक्ताघामाच्या लुटीवर, मस्तवाल झालेल्या धनदांडग्या-भांडवलदारी मालकशाहीचे तारणहार असलेल्या भारतीय जनता पक्षाला रान मोकळं सोडू नका… यातून केंद्र सरकारचा, श्रमिक वर्गाला उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला गेलाय!” असा जोरदार घणाघात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी, ठाण्यात केला.
केंद्र सरकारने लागू केलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तीन शेतकरी काळ्या कायद्यांप्रमाणेच, केंद्र सरकारने या चार काळ्या कामगार कायद्यांच्या माध्यमातून श्रमिकवर्गाचं शोषण करण्याचा कट रचला असून, कामगारवर्ग व कामगार-चळवळ उध्वस्त करु पाहणाऱ्या मोदी-शहा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच ही निदर्शने करण्यात आली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजन राजे यांनी यावेळी केले. एकीकडे नव-अस्पृश्यता म्हणून ओळखली जाणारी कंत्राटी-कामगारपद्धत ही, कामगारांना गुलामगिरीत ढकलत असतानाच, या चार काळ्या कामगार कायद्यांमुळे अवघे कामगारजगत उध्वस्त होणार आहे. त्यामुळे काळ्या कामगार कायद्यांचा नायनाट, हीच कामगारांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरणार असून, काँग्रेसचे नेते व इंडिया-आघाडीचे अध्वर्यू राहुल गांधी यांनीदेखील या चार काळ्या कामगार कायद्याला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेस सत्तेवर येताच, हे काळे कायदे रद्द करु, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभेत केले होते, त्याबद्दलही राजन राजे यांनी, आपल्या भाषणात राहुल गांधींचे जाहीर कौतुक करुन, त्यांचे आभार मानले. दरम्यान, आपल्या तडाखेबंद भाषणात राजे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. अहिल्यानगर येथील सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत बोलताना त्यांनी, कारखानदारांची बाजू घेत, “उद्योगजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून काढू” अशी भाषा वापरली होती. दावोस परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात कोट्यवधी डॉलर्सचे उद्योगधंदे आणण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच, मराठी कामगार देशोधडीला लागला, त्यांच्याच सरकारने कंत्राटीपद्धतीमुळे नोकऱ्या असुरक्षित केल्या, महाराष्ट्रातील उद्योग याच भाजपने राज्याबाहेर नेले आणि तेच मुख्यमंत्री, उद्योजकांची बाजू घेत, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा करतात, हे संतापजनक असल्याचा हल्लाबोल राजन राजे यांनी यावेळी केला. याप्रसंगी डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ही जोरदार निदर्शने करण्यात आली होती. यावेळी कॉ. शिशिर ढवळे, कॉ. उदय चौधरी, समाजवादी नेते जगदीश खैरालिया, संजय मंगला गोपाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे, ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित, प्रवक्ते समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी आदी पदाधिकाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील कंत्राटी व कायम कामगार तसेच, ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
