जवाहरबाग अग्निशमन केंद्र पुनर्विकासाच्या कामामुळे बंद!
भाजपा नगरसेविका नम्रता कोळी यांनी वेधले लक्ष
ठाणे : शहरातील सर्वात जुन्या जवाहरबाग अग्निशमन केंद्राचा कारभार सध्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे. तर शहरातील महत्त्वाची व गर्दीची ठिकाणे लक्षात घेऊन दादोजी कोंडदेव स्टेडियच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वात जुने अग्निशमन केंद्र म्हणून जवाहरबाग येथील अग्निशमन केंद्राची नोंद आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपासून अवघ्या ५०० ते ७०० मीटर अंतरावर केंद्राची जागा आहे. ठाणे रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, ठाणे शहर पोलिस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, जुनी बाजारपेठ, जांभळी नाका होलसेल मार्केट, शाळा व महाविद्यालये आहेत. या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास काही मिनिटांतच जवाहरबाग केंद्रातून अग्निशमन दलाची गाडी पोचत होती. त्यामुळे तत्काळ मदत कार्याबरोबरच आगीवर नियंत्रण मिळवता येत होते. दुर्घटनेची व्याप्ती पाहून अग्निशमन दलाचे जवान अन्य केंद्रातूनही कुमक बोलत असत. मात्र, केंद्राच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे आता जवाहरबाग केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे तत्काळ मदतकार्यात अडचणी येत आहेत, याकडे नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापालिका आयुक्त व मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
काही दिवसांपूर्वी महागिरीतील दाभोळकरवाडी येथे आग लागल्यानंतर कळवा येथून अग्निशमन दलाला बोलाविण्याची वेळ आली. सुदैवाने आग आटोक्यात आल्यामुळे मोठी हानी टळली. या पार्श्वभूमीवर भविष्यातील आपत्तीतील संभाव्य हानी टाळण्यासाठी जवाहरबाग अग्निशमन केंद्र तात्पुरत्या स्वरुपात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गेट क्र. १ जवळ सुरू ठेवावे. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या ठेवाव्यात, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.
