ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचा जलदगती निर्णय; आरोपीची निर्दोष मुक्तता
ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील चौथे विशेष पोक्सो न्यायालय (मा. न्यायाधीश रुबी मालवणकर) यांनी विशेष सत्र प्रकरण क्र. ०९/२०२६ मध्ये आरोपी मिथिलेश सुर्यनारायण मिश्रा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. अवघ्या पंधरा दिवसांत सुनावणी पूर्ण करून दिलेल्या या निर्णयाची नोंद जलदगती न्यायप्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
या प्रकरणात ११ सप्टेंबर २०२५ रोजी काशीगाव पोलीस ठाणे (मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, ठाणे) येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी मिथिलेश मिश्रा व त्यांचा अल्पवयीन मुलगा प्रियांश मिथिलेश मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्र. ४१४/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११५, ३५१(२), ३५२(२) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पूर्ण झाल्यानंतर ६ जानेवारी २०२६ रोजी दोषारोपपत्र ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील चौथ्या विशेष पोक्सो न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानुसार विशेष पोक्सो केस क्र. ०९/२०२६ अशी नोंद झाली. न्यायालयाने १९ जानेवारी २०२६ पर्यंत आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
२३ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयाने आरोप निश्चित (चार्ज फ्रेम) करून दररोज सुनावणी सुरू ठेवली. सरकार पक्षातर्फे अॅड. योगेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले, तर आरोपीतर्फे अॅड. बी. एन. पांडे आणि अॅड. चाँद दगडू फकीर यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाकडून आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी मिथिलेश मिश्रा यांची निर्दोष मुक्तता केली.
या निर्णयानंतर बचाव पक्षाने न्यायालयाच्या जलदगती कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. विशेष पोक्सो न्यायालयाच्या उद्दिष्टानुसार त्वरित सुनावणी होऊन निकाल लागल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *