परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लीम महापौर
परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर विराजमान झाला.
आज पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदावर बाजी मारली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली आहे.
आज झालेल्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौर पदासाठी झालेल्या मतदानात शिवसेनेचे उमेदवार सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना ३९ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना २६ मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि रजिया बेगम यांनी भाजपला मतदान केले नाही.
परभणी महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी 10 मतांनी विजय मिळवला. गणेश देशमुख यांना 37 मते, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार नाजमा अब्दुल रहीम यांना 27 मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अक्षय देशमुख यांनी तटस्थ भूमिका घेतली.
